वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर शहरात सध्या चोऱ्यांच्या सत्राने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १० जानेवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी शहराच्या मुख्य भागातील सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत चक्क तीन बँकिंग मिनी ग्राहक सेवा केंद्रांवर (BC Points) डल्ला मारला.

या धाडसी चोरीमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, एकाच रात्री आणि एकाच पद्धतीने झालेल्या या चोऱ्यांमुळे शहरात टोळी सक्रिय असल्याची चर्चा असून स्थानिक पोलिसांच्या गस्तीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वैजापूर शहरातील स्वस्तिक टॉवर परिसरात संजय सखाराम ढोले यांच्या मालकीचे ‘अनिकेत कम्युनिकेशन’ नावाचे बँक ऑफ बडोदाचे मिनी ग्राहक सेवा केंद्र आहे. शनिवारचा दिवस असल्याने व्यवहार आटोपून ढोले नेहमीप्रमाणे रात्री आपले केंद्र बंद करून घरी गेले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या केंद्राचे लोखंडी चॅनल गेट आणि शटर कशाच्या तरी सहाय्याने वाकवून आत प्रवेश केला.

रविवारी सकाळी शेजारील नागरिकांना शटर उचकटलेले दिसताच त्यांनी ढोले यांना फोनवरून माहिती दिली. ढोले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, आतील सामानाची उचकापाचक झालेली दिसली आणि अंदाजे ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जाधव व कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे स्पष्टपणे कैद झाले असून, पोलीस आता त्यांच्या ओळखीचा माग काढत आहेत.

स्वस्तिक टॉवरमधील चोरीची घटना ताजी असतानाच, शहराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या म्हसोबा चौक, स्टेशन रोड परिसरातील बँकिंग सेंटर्सनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. येथील भगवान शिवाजी दरेकर यांच्या मालकीचे बँक ऑफ बडोदाचे मिनी ग्राहक सेवा केंद्र चोरट्यांनी अगदी त्याच पद्धतीने फोडले. शटर वाकवून आत शिरलेल्या चोरट्यांनी दरेकर यांच्या केंद्रातून ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली.

सकाळी केंद्र उघडण्यासाठी आले असता दरेकर यांना हा धक्कादायक प्रकार समजला. त्यांनी तातडीने वैजापूर पोलिसांना पाचारण केले. या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक भगवान देशमुख, उपनिरीक्षक नलावडे, उपनिरीक्षक नागरगोजे आणि कर्मचारी विजय जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. सलग दुसऱ्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरेकर यांच्या केंद्राच्या शेजारीच स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) मिनी ग्राहक सेवा केंद्र आहे. चोरट्यांनी या केंद्राचेही शटर उचकटून आत प्रवेश मिळवला होता. सलग तीन ठिकाणी चोरी करण्याचा चोरट्यांचा मनसुबा स्पष्ट दिसत होता. मात्र, या केंद्रात चोरट्यांच्या हाती मोठी रोकड लागली नाही. तरीही, ज्या पद्धतीने एकामागून एक शटर तोडण्यात आले, त्यावरून चोरटे अत्यंत सराईत आणि कोणत्याही मोठ्या कारवाईला न भिणारे असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे बँकिंग सेवा देणाऱ्या लहान व्यावसायिकांमध्ये आता असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

वैजापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी, मोबाईल चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, या गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याची भावना सामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि व्यापारी संकुलांमध्ये जर पोलीस गस्त असती, तर एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केले नसते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक प्रकरणांत तक्रार देऊनही तपास पुढे सरकत नसल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढत चालल्याचे चित्र आहे. शहरात भीतीचे सावट पसरले असून, व्यापारी वर्गाने आता पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शहरातील गुन्ह्यांच्या तपासाबाबत एक वेगळीच चर्चा सध्या रंगत आहे. वैजापूरमध्ये जे काही मोजके गुन्हे उघडकीस येत आहेत, त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) कामगिरी मोठी असल्याचे दिसून येते. स्थानिक गुन्हे शाखा तपासात आघाडीवर असताना, स्थानिक वैजापूर पोलीस नक्की करतात तरी काय? असा सवाल आता विचारला जात आहे. गुन्ह्यांचा प्रतिबंध करणे हे स्थानिक पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य असताना, चोऱ्यांचे प्रमाण वाढतच चालल्याने पोलिसांच्या ‘इंटेलिजन्स’ नेटवर्कवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठांनी याकडे तातडीने लक्ष देऊन वैजापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सुरक्षेचे आवाहन आणि पुढील तपास या सर्व प्रकरणांत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवण्याचे आणि मोठ्या प्रमाणात रोकड केंद्रात न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पोलिसांच्या या आवाहनावर नागरिक समाधानी नसून, त्यांना ठोस कारवाई आणि चोरट्यांच्या मुसक्या आवळलेल्या पाहायच्या आहेत. आता वैजापूर पोलीस या तीन मोठ्या चोऱ्यांचा तपास लावून आपली गेलेली पत परत मिळवतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

चोरी करून केवळ रोकड लंपास करणे एवढ्यावरच न थांबता, चोरट्यांनी घटनास्थळी एक चिट्ठी ठेवून थेट पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे केवळ कायदा-सुव्यवस्थेचाच नव्हे, तर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या चिठ्ठीत चोरट्यांनी थेट पोलिसांना उद्देशून लिहिले होते की, “पोलीसवाल्यांना सांगा, मटका, सोरट असे धंदे तुम्ही हप्ते घेऊन चालवता ते बंद करा. माफ करा, तुमचं काहीच नेलं नाही. कर्ज झालं म्हणून नाहीतर चोरालाही मन असतं स्वारी.” या मजकुरामुळे ही चोरी केवळ आर्थिक फायद्यासाठी नसून, एक प्रकारचा संदेश देण्यासाठी करण्यात आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चोरट्यांनी वापरलेली भाषा आणि आशय पाहता, त्यांनी समाजात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांकडे आणि त्याला मिळणाऱ्या कथित पाठबळाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here