
वैजापूर । दीपक बरकसे
वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत काही दिवसांपूर्वी घडलेल्या आगीच्या प्रकारामागे एका पूर्वीच्या अपहार प्रकरणाचा बदला घेण्याचा सूडभाव असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली असून, आणखी एक आरोपी सध्या फरार आहे. आज मंगळवारी पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पोलिसांनी अक्षय ज्ञानेश्वर कराळे (वय २८, करंजगाव, ता. वैजापूर), भरत शिवाजी कदम (वीरगाव, ता. वैजापूर), सचिन सुभाष केरे (वय २५, गवळी शिवरा, ता. गंगापूर), वैभव उर्फ गजू पंढरीनाथ केरे (वय २७, गवळी शिवरा, ता. गंगापूर) आणि धारबा बळीराम बिराडे (वय ३१, अंधेरी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांना अटक केली आहे. याप्रकरणातील आणखी एक आरोपी, अप्पा बालाजी बने (अंधेरी, ता. अहमदपूर, जि. लातूर) हा फरार आहे.
या प्रकरणाची सुरुवात भरत शिवाजी कदम याच्याशी जोडली आहे. कदम याच्यावर वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे ६३ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा वीरगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा राग आणि बदला घेण्यासाठी कदम याने इतर आरोपींसह मिळून हा कट रचला. पोलिस तपासात असे समोर आले की, या गुन्ह्यासाठी आरोपींनी मालेगाव येथून एक स्विफ्ट कार खरेदी केली. कार खरेदीच्या चलनात चुकीचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकण्यात आले होते.
आरोपींनी चोरीचा बनाव रचून बँकेत प्रवेश केला. त्यांनी बँकेत पेट्रोल ओतून स्फोट घडवला. या स्फोटात दोन आरोपी स्वतःच जखमी झाले. स्फोटानंतर बँकेचे शटर बँकेबाहेर उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमध्ये अडकले. यामुळे आरोपींना गाडी सोडून पळ काढावा लागला. त्यानंतर बँकेला आग लागली आणि संपूर्ण बँक जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. बँकेबाहेर उभ्या असलेल्या गाडीत पोलिसांना बनावट नंबर प्लेट्स आढळल्या. बँकेचे व्यवस्थापक बजरंगलाल ठाका यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी बँकेबाहेर आढळलेल्या गाडीच्या नंबर प्लेटचा तपास केला असता, त्यापैकी एक नंबर प्लेट मालेगाव येथील असल्याचे आढळले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांनी मालेगाव येथे जाऊन तपास केला. तिथे गाडी एका ऑटो कन्सल्टन्सीमार्फत विकली गेल्याचे समोर आले. मात्र, चलनात नाव आणि मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याचे लक्षात आले. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी अक्षय कराळे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, हा गुन्हा भरत कदम याच्या सांगण्यावरून घडल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी इतर चार आरोपींना अटक केली.
पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी सांगितले की, या प्रकरणातील फरार आरोपी अप्पा बालाजी बने याचा शोध सुरू आहे. तसेच, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. पोलिसांनी या प्रकरणात तांत्रिक आणि प्रत्यक्ष तपासाच्या आधारे मोठे यश मिळवले आहे.
या आगीमुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बँक पूर्णपणे जळून खाक झाली असून, यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बँक व्यवस्थापनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. वैजापूर शहरात ही घटना घडल्यानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बँकेत अशा प्रकारे आग लावण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तपास तीव्र केला असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच, या कटामागील इतर संभाव्य कारणांचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद गोष्टींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.



