वैजापूरमध्ये अंगणवाडी सेविकांचा संताप; पर्यवेक्षिकेच्या जाचाविरोधात एल्गार, तत्काळ बदलीची मागणी

वैजापूर । दिपक बरकसे

ग्रामीण भागातील कुपोषण निर्मूलन आणि बालकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सध्या प्रशासकीय जाचाचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

वैजापूर तालुक्यातील लाडगांव बीटमधील पर्यवेक्षिका शोभा साळवे यांच्याकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे अंगणवाडी सेविकांचे मानसिक संतुलन बिघडत चालले असून, त्यांच्या त्रासाला कंटाळून आता सेविकांनी थेट बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे (CDPO) धाव घेतली आहे. संबंधित पर्यवेक्षिकेची दोन दिवसांत बदली न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

लाडगांव बीटमधील अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यवेक्षिका शोभा साळवे या गेल्या अनेक दिवसांपासून सेविकांना कामाच्या ठिकाणी अत्यंत अपमानास्पद वागणूक देत आहेत. सरकारी कामाचा आढावा घेताना किंवा भेटीदरम्यान त्या सेविकांशी अरेरावीची भाषा वापरतात. केवळ कामापुरते मर्यादित न राहता, अनेकदा लज्जास्पद शब्दांत बोलून महिला सेविकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली जात असल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा अशा प्रकारे छळ होणे हे प्रशासकीय शिस्तीला धरून नसल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

केवळ अपमानास्पद वागणूकच नव्हे, तर प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर करून रजा नाकारणे आणि विनाकारण त्रस्त करणे असे प्रकार लाडगांव बीटमध्ये सातत्याने घडत आहेत. अंगणवाडी सेविका या दुर्गम भागात जाऊन शासनाच्या योजना राबवतात, मात्र त्यांना सहकार्य करण्याऐवजी पर्यवेक्षिका साळवे या मानसिक त्रास देण्यातच धन्यता मानत असल्याची तक्रार सेविकांनी केली आहे. या सततच्या तणावामुळे अनेक सेविकांच्या वैयक्तिक आरोग्यावर आणि कौटुंबिक जीवनावरही विपरीत परिणाम होत असून, ‘आम्ही काम करायचे की हा मानसिक छळ सहन करायचा?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात वैजापूरच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये पर्यवेक्षिकेच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचण्यात आला आहे. “आम्ही प्रामाणिकपणे आमचे कर्तव्य बजावत आहोत, मात्र शोभा साळवे यांच्या अरेरावीमुळे कामाचे वातावरण दूषित झाले आहे. त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाला असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि पुढील दोन दिवसांत त्यांची येथून बदली करावी,” अशी आग्रही मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. जर दिलेल्या मुदतीत बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर पुढील काळात काम बंद आंदोलन किंवा तीव्र निदर्शने करण्याचा पवित्रा या सेविकांनी घेतला आहे.

या निवेदनावर लाडगांव बीटमधील अनेक अंगणवाडी सेविकांच्या स्वाक्षऱ्या आहेत, ज्यामध्ये अश्विनी सोनवणे, भाग्यश्री पवार, अनिता साळवे, सारिका वाघ, दुर्गा कदम, सीमा दाभाडे, रुपाली चौधरी, पूजा निर्मळ, शोभा गुंड, सपना राजपूत, शोभा मते, पुष्पा लहिरे, आशा भोसले, ललिता कांबळे, शोभा शिंगरुळे, अश्विनी रक्ताटे, अर्चना गाढे, वंदना जाधव, पुष्पा जाधव, जया गाढे, निकिता ठोंबरे, भारती गायकवाड आदींचा समावेश आहे. आता या प्रकरणावर बालविकास प्रकल्प अधिकारी काय भूमिका घेतात आणि पीडित अंगणवाडी सेविकांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here