वैजापूर । दीपक बरकसे

पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवराई येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत, ग्रामस्थांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, अखेर संतप्त ग्रामस्थांनी ‘आरपारची लढाई’ लढण्याचा पवित्रा घेतला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच वर्षांत ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने विकासकामांच्या नावाखाली सरकारी निधीचा अपहार केला आहे. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांसाठी आलेला १५ व्या वित्त आयोगाचा निधी कागदोपत्री खर्च दाखवून प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली किंवा काही कामे केवळ कागदावरच राहिली आहेत, असा खळबळजनक आरोप आंदोलकांनी केला आहे.

या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) दिलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की, त्यांनी यापूर्वी अनेकदा लेखी पत्रव्यवहार करून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “आम्ही प्रशासनाला पुरेसा वेळ दिला, पण आम्हाला केवळ आश्वासने मिळाली. आता प्रत्यक्ष स्थळ पाहणी झाल्याशिवाय आणि दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,” अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम आहेत. उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे की, या आंदोलनादरम्यान जर कोणाच्याही आरोग्यास इजा पोहचली किंवा कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली, तर त्यास सर्वस्व जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता जिल्हा प्रशासन कशा प्रकारे पाहते आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणीचे आदेश कधी दिले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here