
वैजापूर । दीपक बरकसे
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख यांनी पक्षाच्या नऊ पैकी दोन जिल्हा परिषद सदस्यांवार पैसे खाल्ल्याचा आरोप केल्यानंतर तालुक्यातील शिऊर जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी गुरुवारी (१९ मार्च) तातडीने त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांचे खंडण केले.
आपण केवळ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत मतदान प्रक्रियेपासून लांब राहिलो आहे. तथापि जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी १० ते १७ मार्च या कालावधीत निवडून आलेल्या नऊ सदस्यांची इगतपुरी, ठाणे, नवी मुंबई, कर्जत, गोवा अशा ठिकाणी ट्रिप घडवून आणत आम्हाला अक्षरशः ओलीस ठेवले व आमचा परस्पर १८ कोटी रुपयांचा सौदा केला व त्यातील चार कोटी रुपये स्वतः मिळवले असा खळबळजनक आरोप निकम यांनी केला. खंडणी जमा करणे, प्लॉट बळकावणे, प्रॉपर्टी हडप करणे हे दानवे यांचे नेहमीचे काम असल्याचा टोलाही निकम यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
ते म्हणाले, ८ फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मी मतदारांचा दौरा करत नागरिकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले. तसेच मतदारांनी सत्तेसोबत कसे जाता येईल याबाबतही भावना व्यक्त केल्या. त्यानंतर निवडून आलेल्या जिल्ह्यातील नऊ सदस्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची २१ फेब्रुवारीला भेट घेतली.त्यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणी व संघटन करण्यास सांगितले. तसेच सत्तेसाठी भाजप किंवा शिवसेनेसोबत जाणे उचित होणार नाही असेही सांगितले.
मात्र त्यानंतर जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी १० मार्चला सर्व नऊ सदस्यांना एकत्र बोलावले व सहल घडवून आणत आमचा परस्पर १८ कोटी रुपयांना अध्यक्षपदासाठी सौदा केला. यातील चार कोटी रुपये त्यांनी स्वतः घेतले असून उर्वरित रक्कम मतदान केल्यानंतर त्यांना मिळणार होती व त्यातील काही रक्कम ते सदस्याच्या पदरात टाकणार होते. या बाबीची भुणूक लागताच आम्ही तातडीने पक्षाचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर व मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क केला व आपली भूमिका सांगितली. त्यानंतर आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणाले.
अशी केली सुटका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नऊ सदस्यांना आठ दिवस ओलीस ठेवण्यात आले. सोबत सुरक्षा रक्षकांचा कडक पहारा होता. तसेच आमचे मोबाईलही काढून घेण्यात आले होते. मात्र आम्हाला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करायचे असल्याने व दानवे यांची भूमिका मान्य नसल्याने सुरुवातीला मी व ललिता सोनवणे यांनी १७ मार्चला मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने सुटका करत तेथून पलायन केले व नंतर बाकीचे सदस्य तावडीतून सुटले असे निकम यांनी स्पष्ट केले.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



