
वैजापूर । दिपक बरकसे
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम शांत होत असतानाच आता ग्रामीण भागातील सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी युती आणि आघाड्यांच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
याच दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात अखेर युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. मात्र, ही घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, खुद्द मंत्र्यांच्या गाड्या अडवण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील ६३ जिल्हा परिषद गटांच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संयुक्तपणे युतीची घोषणा केली. या निर्णयानुसार शिवसेना २५ जागांवर, तर भाजप २७ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यांपैकी केवळ सात तालुक्यांमध्येच ही युती सक्रिय असणार आहे. सोयगाव आणि सिल्लोड या दोन महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे ठाकणार आहेत. सिल्लोड-सोयगावमधील ११ जागांवर युती न करण्याचा निर्णय शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे घेण्यात आला असल्याचे संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सत्तार यांनी ‘मी स्वतंत्र लढणार’ अशी भूमिका घेतल्याने या दोन तालुक्यांत महायुतीमध्येच ‘फ्रेंडली फाईट’ पाहायला मिळणार आहे.
युतीची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली. वैजापूर तालुक्यातील जागावाटपावरून भाजप कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. वैजापूरमधील जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी केवळ ३ जागा भाजपला मिळाल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला. ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि पक्ष वाढवला, ती जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांचा रस्ता रोखून धरला आणि त्यांच्यासमोर हात जोडून ‘साहेब, ही युती तोडा’ अशी विनंती केली. कार्यकर्त्यांचा रोष इतका तीव्र होता की, त्यांनी नेत्यांच्या गाड्यांना घेराव घातला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या राड्याचे मुख्य कारण म्हणजे उमेदवारीचे गणित. भाजप कार्यकर्त्यांच्या मते, वैजापूरमध्ये ज्या जागा शिवसेनेला देण्यात आल्या आहेत, तेथील संभाव्य उमेदवार हे भाजपच्या निष्ठावान नेत्यांना आणि पक्षाला जाहीरपणे विरोध करणारे किंवा अपशब्दात बोलणारे आहेत. अशा परिस्थितीत ज्यांनी पक्षावर टीका केली, त्यांच्यासाठीच आता काम कसे करायचे? असा संतप्त सवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केवळ तोंडी निषेध न नोंदवता थेट मंत्र्यांनाच धारेवर धरल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच महायुतीमध्ये बिघाडीचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच महानगरपालिका निवडणुकीच्या वेळीही अशाच प्रकारचा गदारोळ छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता, त्याचीच पुनरावृत्ती आता जिल्हा परिषदेच्या वेळीही होताना दिसत आहे.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर, अखेर पोलिसांनी कडे करून मंत्री अतुल सावे यांना तिथून सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा डळमळीत होण्याची चिन्हे आहेत. पक्षाने कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न केल्यास बंडखोरी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वैजापूर आणि इतर तालुक्यांत भाजपचे अनेक इच्छुक अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून, यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
एकूणच, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाब्या मिळवण्यासाठी नेत्यांनी कागदावर युतीची मोहोर उमटवली असली, तरी ती मैदानात किती यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कार्यकर्त्यांचा हा उद्रेक शांत करण्यात नेत्यांना यश येते की ही नाराजी युतीला महाग पडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच झालेला हा राडा आगामी काळात राजकीय संघर्षाची धार अधिक तीव्र करणार, हे मात्र निश्चित.



