संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती! माजी सरपंचाचा खून, ११ जणांनी लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी मारले

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज येथील माजी सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची जखम अद्याप ताजी असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका माजी सरपंचाची अशाच प्रकारे अमानुष हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जटवाड्याजवळील ओहर गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची ११ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड आणि शस्त्रांनी हल्ला करून हत्या केली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी बीडमध्ये ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांचे अपहरण करून सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने मारहाण करत जीव घेतला होता, अगदी त्याच क्रूरतेने ओहर गावातील ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओहर गावातील गट क्रमांक १९८ मधील साडेचार एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून दोन कुटुंबांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून म्हणजेच २०२२ पासून तीव्र संघर्ष सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, मृत दादा सांडू पठाण यांच्याकडे या जमिनीचा कायदेशीर ताबा होता आणि महसूल दप्तरी तशा स्पष्ट नोंदीही करण्यात आल्या होत्या.

मात्र, हा कायदेशीर अधिकार धुडकावून लावत विरोधी गटाने वारंवार वादाचे प्रसंग निर्माण केले होते. बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास याच वादाचे पर्यावसान रक्तरंजित संघर्षात झाले. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून पठाण कुटुंबावर हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शी आणि मयताचा नातू मोईन पठाण याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सर्व कुटुंबीय घरात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने घराला विळखा घातला. या टोळक्याच्या हातात लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रे होती.

( नक्की वाचा : क्रूरतेचा कळस! आई-बापानेच ३ महिन्यांच्या आजारी बाळाला ठार मारलं, शंका येऊ नये म्हणून ऑपरेशनचा बनाव)

कोणत्याही संवादाविना त्यांनी थेट कुटुंबावर हल्ला चढवला. ६९ वर्षीय दादा सांडू पठाण यांना आरोपींनी इतक्या अमानुषपणे मारहाण केली की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेले त्यांचे मुलगे माजेद पठाण, जुनैद पठाण आणि अन्य एक सदस्य देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना पाहून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या अमानवी कृत्यामुळे ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच हर्सूल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी एकूण ११ जणांविरोधात खुनाचा (कलम ३०२) आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, इतर दहा आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली असून, परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र, दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

( नक्की वाचा : जामखेड हादरलं! कलाकेंद्रातील नृत्यांगनेचा मृतदेह लॉजमध्ये आढळला, ३५ वर्षीय दिपालीसोबत नेमकं काय घडलं?)

या हत्येनंतर ओहर गावामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. संतापलेल्या नातेवाइकांनी आणि ग्रामस्थांनी आरोपींच्या दुकानांची तोडफोड केल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणाप्रमाणेच याही घटनेत टोळीने केलेल्या हल्ल्याचे स्वरूप पाहता, अशा प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे. जमिनीच्या वादातून एका ज्येष्ठ लोकप्रतिनिधीचा बळी जाणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असून, या प्रकरणातील फरार आरोपींना कधी अटक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here