
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर गेल्या वीस दिवसांपासून उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदांबाबत निर्माण झालेला पेच अखेर आज सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते हाजी अकील शेख यांच्या शब्दाला मान देत त्यांचे सुपुत्र रियाज अकील शेख यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या निवडीमुळे वैजापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज फडकला असून, हाजी अकील शेख यांची पुण्याई आणि राजकीय चातुर्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण आणि नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहे. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी युती करून निवडणूक लढवली होती. या युतीने वैजापूर नगरपालिकेत एकहाती सत्ता प्राप्त केली असून, या विजयात हाजी अकील शेख यांचा मोठा वाटा राहिला आहे. युती धर्म पाळत आणि दिलेला शब्द पूर्ण करत नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी रियाज शेख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
उपनगराध्यक्ष पदासोबतच स्वीकृत नगरसेवक पदांचा प्रश्नही मार्गी लागला आहे. यामध्ये प्रशांत नाना कंगले, प्रकाश चव्हाण आणि शिवसेना (शिंदे गट) कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेले संजय बोरणारे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडींमुळे नगरपालिकेतील सत्तासमीकरणे अधिक भक्कम झाली असून सर्वत्र या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. काही इच्छुकांच्या पदरी निराशा पडली असली, तरी शहराच्या विकासासाठी महायुतीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील शेख यांनी डॉ. दिनेश परदेशी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, डॉ. परदेशी हे दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्त्व आहेत. राजकारणात दिलेल्या शब्दाला महत्त्व असते आणि ते त्यांनी आज रियाज शेख यांच्या निवडीतून दाखवून दिले आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि डॉ. परदेशी यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नवनियुक्त उपनगराध्यक्ष रियाज शेख यांनी ही निवड मुस्लिम समाजाला मिळालेला मोठा न्याय असल्याचे नमूद केले. तब्बल वीस वर्षांनंतर मुस्लिम समाजातील व्यक्तीची या पदावर वर्णी लागल्याने समाजात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, वीस वर्षांपूर्वी रियाज शेख यांचे वडील हाजी अकील शेख यांनी याच पदाची जबाबदारी सांभाळली होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आता रियाज शेख शहराच्या विकासासाठी सक्रिय झाले आहेत. साबेर भाई आणि मजीद शेठ कुरेशी यांच्यानंतर मुस्लिम समाजाला हे मानाचे पद मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
शेवटी, नवनियुक्त उपनगराध्यक्ष रियाज शेख यांनी स्पष्ट केले की, सर्वांना सोबत घेऊन काम करणे ही आमची प्राथमिकता असेल. डॉ. दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहतील. प्रशासकीय कामांना गती देणे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



