वैजापूर । दीपक बरकसे

कापसाच्या गाठींमध्ये ९० टक्के कचरा भरून बँका आणि वेअर हाऊस कंपनीची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत वेअर हाऊसच्या तीन अधिकाऱ्यांसह गंगापूरमधील दोन व्यापाऱ्यांना अटक केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास श्रीरामपूरपर्यंत पोहोचला असून महांकाळवाडगाव येथील एका माजी सरपंचालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या मोठ्या घोटाळ्याची सुरुवात १६ डिसेंबर २०२५ रोजी झाली. गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथील अशोक सदाशिव राऊत (लक्ष्मी व्यंकटेश ट्रेडर्स) आणि शिवनारायण बद्रीनारायण मालपाणी (शिवा ट्रेडर्स) या दोन व्यापाऱ्यांनी मल्हारवाडी येथील सहा हजार चौरस फुटांचे गोदाम ११ महिन्यांच्या भाडेतत्त्वावर घेतले. या व्यापाऱ्यांनी ‘इंडियन कमोडिटीज’ या वेअर हाऊस कंपनीच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्याची योजना आखली होती.

नियमानुसार, वेअर हाऊस कंपनी आणि बँक यांच्यात ‘कोलॅटरल मॅनेजमेंट’चा करार असतो. कंपनी गोदामातील तारण मालाची गुणवत्ता तपासून अहवाल देते आणि त्या आधारावर बँक कर्ज मंजूर करते. या प्रक्रियेत वेअर हाऊसचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी संगनमत करून बनाव रचला. गोदामाचे व्यवस्थापक अरबाज खान, गुणवत्ता तपासणी व्यवस्थापक सिद्धार्थ अमराव आणि सहव्यवस्थापक रोशन गोन्नाडे यांनी या व्यापाऱ्यांच्या मालाची शिफारस केली.

डिसेंबर २०२५ च्या अखेरीस या गोदामात कापसाच्या गाठी साठवण्यात आल्या. वरील तिन्ही अधिकाऱ्यांनी या मालाचे मूल्य ६ कोटी ५९ लाख रुपये असल्याचे खोटे व्हॅल्युएशन बँकेला दिले. या अहवालावर विश्वास ठेवून एचडीएफसी बँकेने व्यापाऱ्यांना तातडीने ५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. मात्र, हा सर्व प्रकार केवळ कागदावरच चोख होता, प्रत्यक्षात गोदामात ठेवलेला माल बोगस होता.

५ जानेवारी रोजी कंपनीचे ऑडिटर संतोष चांडक यांनी या गोदामाची अचानक तपासणी केली. तपासणी दरम्यान त्यांना धक्कादायक बाब आढळली. कापसाच्या गाठींमध्ये ९० टक्के कचरा भरलेला होता आणि केवळ वरून कापसाचा पातळ थर लावून तो माल चांगला असल्याचे भासवले होते. हा फसवणुकीचा प्रकार उघड होताच कंपनीने व्यापाऱ्यांकडे विचारणा केली, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन संपर्क तोडला.

इंडियन कमोडिटीज कंपनीचे हेड ज्ञानेंद्र चतुर्वेदी यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली. सुरुवातीला पाच आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस तपासात या गुन्ह्यातील मास्टरमाईंड श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचे समोर आले. या घोटाळ्यातील ५ कोटी रुपयांपैकी १ कोटी ८० लाख रुपये श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील माजी सरपंचाच्या कृषी फर्मच्या खात्यावर वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने महांकाळवाडगाव येथे धाड टाकून संबंधित माजी सरपंचाला अटक केली.

या गुन्ह्यात आतापर्यंत अशोक सदाशिव राऊत, शिवनारायण मालपाणी, रोशन गोनांदे, अरबाज खान, सिद्धार्थ अमराव आणि महांकाळवाडगावचे माजी सरपंच अशा सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६१(१), ३३९, ३३६, ३१८, ३१६(२) आणि ३(५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस तपासात या फसवणुकीच्या प्रकाराचा संबंध जुन्या गुन्हेगारी पद्धतीशी जोडला जात आहे. कापसाच्या गाठी तारण ठेवून कोट्यवधींचे कर्ज घ्यायचे, त्यानंतर त्या मालाचा विमा (Insurances) उतरवायचा आणि कालांतराने गोदामाला ‘कृत्रिम’ आग लावून विम्याचे पैसे लाटायचे, यालाच परिसरात ‘श्रीरामपूर ग्रामीण पॅटर्न’ म्हटले जाते. यापूर्वी श्रीरामपूर एमआयडीसी, संगमनेर आणि पुणतांबा येथील गोदामांमध्येही अशाच प्रकारच्या आगीच्या घटनांमधून विम्याचा पैसा उकळल्याचे प्रकार समोर आले होते.

अहिल्यानगर आणि संभाजीनगर जिल्ह्यांतील बँकांनी अशा संशयास्पद व्यापाऱ्यांना काळ्या यादीत टाकल्यामुळे, या रॅकेटच्या सूत्रधारांनी आपले केंद्र नांदगाव तालुक्यात हलवले होते. वेअर हाऊसचा अधिकारी सिद्धार्थ अमराव हा श्रीरामपूरचाच रहिवासी असल्याने त्याच्या ओळखीचा फायदा घेत सूत्रधाराने हा डाव रचला होता. सध्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या कारवाईमुळे कृषी कर्ज आणि वेअर हाऊस क्षेत्रातील मोठ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here