
वैजापूर । दीपक बरकसे
कर्तव्यात कसूर आणि गंभीर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या गंभीर परिस्थितीत जबाबदारीने काम न करणे, वरिष्ठांना माहिती न देणे आणि महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहणे, अशा अक्षय्म दुर्लक्षाबद्दल वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी पुरणगाव येथील तलाठी अमोल पोपट काळे यांना तात्काळ निलंबित करण्याचे कठोर पाऊल उचलले आहे. प्र
शासकीय सेवेत उदासीनता आणि गैरजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. गोदावरीच्या पाण्याने वेढलेल्या नारायणपूर येथील काही कुटुंबं पुराच्या प्रवाहात अडकली असतानाही, संबंधित अधिकाऱ्याने याबाबत तोंडी किंवा दूरध्वनीद्वारे कोणतीही माहिती तहसील कार्यालय किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली नाही, हा सर्वात गंभीर आणि संवेदनशील मुद्दा या निलंबन आदेशात नमूद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला मोठे पूर आले होते. या पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याच दिवशी पहाटे मौजे नारायणपूर येथे गोदावरी नदीपात्रात आलेल्या पुरामुळे काही कुटुंबं अडकून पडल्याची गंभीर घटना घडली होती. प्रशासनाकडून तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले असताना, ग्राम महसूल अधिकारी अमोल पोपट काळे हे घटनास्थळी खूप उशिराने उपस्थित झाले, असे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
या गंभीर हलगर्जीपणाव्यतिरिक्त, निलंबन आदेशात त्यांच्या मागील कामकाजातील त्रुटींवर देखील बोट ठेवण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांच्या सज्जातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात तोंडी तक्रारी केल्या होत्या आणि त्यांना सुधारणा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे, जी बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
निलंबन आदेशातील माहितीनुसार, आज दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी माजी खासदार, माजी आमदार आणि उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी स्वतः अतिवृष्टीग्रस्त भागास भेट दिली. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान ग्राम महसूल अधिकारी अमोल काळे हे त्यांच्या मुख्यालयी उपस्थित नव्हते, असे निदर्शनास आले.
त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे, याच दिवशी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतीपिकांचे आणि बाधित व्यक्तींच्या घरे/विहीर इत्यादी बाबींचे पंचनामे करण्याकरिता तसेच बाधितांना शासकीय मदत देण्याबाबतचे निकष व निर्देश यावर चर्चा करण्यासाठी पंचायत समिती सभागृह, वैजापूर येथे एक महत्त्वाची बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शासनाच्या मदतकार्यात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या बैठकीला ग्राम महसूल अधिकारी काळे हे कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता विना परवानगी गैरहजर राहिले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाच्या मदतकार्यात आणि महत्त्वपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेत अशा प्रकारे गैरहजर राहणे, हा कर्तव्यनिष्ठेचा भंग असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
हे ही वाचा : गोदावरीच्या पुराचा श्रीक्षेत्र सरला बेटला फटका; चाहरी बाजूंने पाण्याचा वेढा
तहसीलदार वैजापूर यांचा प्रस्ताव आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या कामातील सततचा हलगर्जीपणा लक्षात घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही कठोर कारवाई केली आहे. शासकीय सेवेत असताना आदेशांचे/निर्देशांचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक असताना, अमोल काळे यांनी तसे केलेले नाही. त्यांनी आपल्या कामकाजात नितांत सचोटी आणि कर्तव्यात परायणता ठेवण्यात कसूर केली आहे.यामुळे
उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी तलाठी अमोल पोपट काळे शासन सेवेतून आदेशाच्या दिनांक पासून तात्काळ निलंबित केले आहे. संकटकाळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असलेल्या तत्परता आणि संवेदनशीलतेचा अभाव या कारवाईला कारणीभूत ठरला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठेबाबत एक गंभीर संदेश गेला आहे, आणि नैसर्गिक आपत्तीच्या व्यवस्थापनात कोणतीही शिथिलता खपवून घेतली जाणार नाही, हे शासनाने स्पष्ट केले आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



