
वैजापूर । दीपक बरकसे
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्यासाठी, घटनास्थळी वेळेत पोहोचण्यासाठी राज्यातील पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणतीही घटना घडल्यास तातडीने ‘११२’ नंबर डायल करा, अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी दाखल होतील. मात्र वैजापूरमध्ये भलताच प्रकार समोर आला आहे.
‘डायल ११२’ या आपत्कालीन सेवेवर एका व्यक्तीने अनोळखी महिलेचा मृतदेह पडल्याची खोटी माहिती दिली. यामुळे विनाकारण पोलिसांचा वेळ वाया गेला आणि या अत्यावश्यक सेवेचा दुरुपयोग झाला. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी मदन शिवाजी ठोंबरे (रा. भायगाव, ता. वैजापूर) या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार शुभम आत्माराम रावते हे गेल्या तीन महिन्यांपासून वैजापूर पोलीस ठाण्यात जनरल ड्युटीवर कार्यरत आहेत. १८ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत त्यांची ‘डायल ११२’ ची ड्युटी होती. आज, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी एम.डी.टी. क्रमांक २ वर मोबाईल क्रमांक ९५४५३३३११० वरून मदन शिवाजी ठोंबरे यांचा कॉल आला. कॉलरने ‘जरुळ फाटा’ येथे अनोळखी महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती दिली.
या महत्त्वाच्या माहितीनंतर पोलिस अंमलदार रावते यांनी तातडीने पो. कॉ.उशीर यांच्यासह सकाळी ७ वाजता घटनास्थळी जरुळ फाटा येथे धाव घेतली. पोलिस पथक सकाळी ७ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कॉलरला फोन करून संपर्क साधला असता, त्या ठिकाणी कोणताही मृतदेह आढळून आला नाही. तसेच, परिसरातील नागरिकांशी विचारपूस केली असता, मृतदेह पडल्याची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. आश्चर्याची बाब म्हणजे, या कॉलरने खोटी माहिती देऊन घटनास्थळी ॲम्ब्युलन्सला देखील बोलावले होते, असे पोलिसांना समजले. यामुळे कॉलरने केवळ पोलिसांचीच नव्हे, तर आरोग्य यंत्रणेचीही दिशाभूल केली.
ड्युटीवर असलेल्या पोलिस अंमलदार शुभम रावते यांच्या निदर्शनास आले की, मदन शिवाजी ठोंबरे यांनी कोणत्याही प्रकारची अत्यावश्यक परिस्थिती नसताना पोलिसांना खोटी माहिती देऊन व्यस्त ठेवले. ठोंबरे यांनी ‘डायल ११२’ या महत्त्वपूर्ण प्रणालीचा दुरुपयोग केला. यामुळे गरजू लोकांना आवश्यक वेळी या सेवेचा लाभ घेता येऊ शकला नसता. हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन, पोलिस अंमलदार शुभम रावते यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन मदन शिवाजी ठोंबरे यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. आपत्कालीन सेवेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



