
वैजापूर | दीपक बरकसे
वैजापूर शहरातील लाडगाव रोड परिसरात एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना समोर आली असून, वेळीच पोलिस आणि नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे मुलगा कोपरगाव येथे सुखरूप सापडला. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Vaijapur kidnapping news)
पीडित मुलाची आई माधुरी गणेश फुलारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या सासरच्या घरी लाडगाव रोड, वैजापूर येथे राहत असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन वर्षांचा मुलगा कुणाल आहे. शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास कुणाल घराबाहेर अंगणात खेळत असताना अचानक गायब झाला. (Child abduction Maharashtra)
हे वाचलं का? – कसं फत्ते झालं ‘ऑपरेशन सिंदूर’? २३ मिनिटांत पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारे ‘ते’ ९ व्हिडिओ समोर
घटनेच्या वेळी माधुरी यांची आई लताबाई शिंदे ही अंगणात उभी होती. मात्र काही क्षणासाठी ती बाथरूममध्ये गेली असता, कुणाल दिसेनासा झाला. लगेचच शेजारील महिला कविता शिंदे आणि काही इतरांनी सांगितले की, लाल रंगाच्या आयशर गाडीत एक इसम कुणालला जबरदस्तीने घालून नेल्याचे त्यांनी पाहिले. ही गाडी भुस्याने भरलेली होती व पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकने झाकलेली होती. (Vaijapur latest crime update)

त्यानंतर घाबरलेल्या माधुरी आणि लताबाई यांनी तातडीने पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गाडी कोपरगावकडे गेल्याचे लक्षात आले. लताबाई यांनी कोपरगावमधील नातेवाईक गणपत यांना फोन करून घटनेची माहिती दिली. गणपत यांनी तत्काळ खबरदारी घेत गाडी थांबवली आणि त्यामधून कुणालला सुरक्षित बाहेर काढले. (Kidnapping foiled in Maharashtra)
हे वाचलं का? – धक्कादायक! होणाऱ्या नवऱ्याला संपवण्यासाठी नवरीने रचला कट, दीड लाखांची सुपारीही दिली, पण शेवटी जे काही झालं ते…
पुढे, लताबाई आणि कुणालचे वडील गणेश फुलारे मोटरसायकलवरून कोपरगावमधील सौसर गावात पोहोचले. तेथे आयशर गाडी (क्र. MH-14-BJ-4132) आणि अपहरणकर्ता दोघांनाही ग्रामपंचायत कार्यालयात आणले गेले. पोलिसांनी तेथे पोहोचून आरोपीस ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत आरोपीने आपले नाव बाजीराव भानुदास कांदळकर (वय 45), रा. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले. त्यास आयशर गाडीसह वैजापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. (kidnapping case)
या घटनेनंतर पीडित आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बाजीराव कांदळकर याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. त्याने लबाडीच्या इराद्याने व बळाचा वापर करून चिमुकल्याचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे वैजापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई करत मुलाला सुखरूप परत आणल्याने पालकांसह स्थानिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. अधिक तपास वैजापूर पोलिस करीत आहेत. (Missing child found news)

Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



