छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांना लक्ष करून भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला होता. मात्र, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने तपास चक्र फिरवत एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत.

या कारवाईमुळे विरगाव आणि शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन मोठे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी चोरी झाली होती. फिर्यादी ज्ञानेश्वर रखमाजी जाधव हे आपल्या कुटुंबासह एका नातेवाईकाच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून धानोरा (ता. गंगापूर) येथे गेले होते. सकाळी साडे नऊ ते सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकरमधून ५० हजार रुपये नगदी आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेनंतर विरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) आणि ३३१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. पथकाने घटनेच्या ठिकाणापासून ते आरोपी ज्या मार्गावरून पसार झाला असावा, अशा सर्व संभाव्य रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तब्बल ३० संशयित व्यक्तींची आणि त्यांच्या वाहनांची पडताळणी केल्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंतापूर शिवार येथील आजब्या महादू भोसले याचे नाव समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी आरोपी आजब्या भोसले हा आपल्या दुचाकीवरून अंतापूरकडून गंगापूरच्या दिशेने येत असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने गंगापूर ते भेंडाळा रोडवरील राजवाडा दलित स्मशानभूमी परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी दुचाकीवरून येताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ९ फेब्रुवारी रोजी गाढेपिंपळगाव येथील बंद घराचे कुलूप टांभीच्या सहाय्याने तोडून चोरी केल्याचे त्याने मान्य केले.

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, आरोपीने केवळ एकच नव्हे तर २ फेब्रुवारी २०२६ रोजी शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनकोरी येथील एका शेतातील बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरले होते. पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांमधील चोरीला गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी विरगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीत पो. उपनिरीक्षक महेश घुगे, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, बलवीरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे, जीवन घोलप तसेच फिंगर प्रिंट विभागाचे स.पो.नि. मुहमद पठाण व इतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here