वैजापूर । दिपक बरकसे

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. जिल्ह्यात सत्तास्थापनेसाठी महायुतीने कंबर कसली असून, भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.

नव्या सूत्रानुसार भाजप २७ जागांवर तर शिवसेना २५ जागांवर नशीब आजमावणार आहे. राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संयुक्तपणे या निर्णयाची माहिती दिली असली, तरी ही घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी संतापाचा कडेलोट करत आपल्याच नेत्यांच्या गाड्या अडवल्याने जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

दिवसभर चाललेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर संध्याकाळी उशिरा जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले. महायुतीमधील या समन्वयामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकणार, असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. मात्र, हे जागावाटप जाहीर होताच वैजापूरमधील कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा स्फोट झाला. वैजापूर तालुक्यातील जागा वाटपावरून भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांची गाडी अडवून “युती तोडा, युती तोडा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या प्रकारामुळे महायुतीसमोरील अंतर्गत बंडाळी मोडून काढण्याचे मोठे आव्हान आता नेत्यांसमोर उभे ठाकले आहे.

जिल्ह्यातील एकूण राजकीय समीकरणांचा विचार करता, सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यांनी मात्र महायुतीला मोठा पेच निर्माण करून दिला आहे. या दोन्ही तालुक्यातील ११ जागांवर युती न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येथे भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात ‘आरपारची’ लढाई लढणार आहेत. विशेष म्हणजे, सिल्लोडमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडल्याने येथे ‘मैत्रीपूर्ण’ नव्हे, तर ‘शत्रुत्वाची’ लढत होण्याची चिन्हे आहेत. अतुल सावे यांनी स्पष्ट केले की, सिल्लोड आणि सोयगावमध्ये अब्दुल सत्तार यांनी स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतल्याने भाजपनेही तिथे आपले उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

वैजापूरमधील राडा हा प्रामुख्याने जागावाटपातील विषमतेमुळे झाल्याचे दिसून येत आहे. वैजापूर तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटांपैकी भाजपला केवळ ३ जागा मिळाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून जे लोक भाजप नेत्यांवर टीका करत आहेत, त्यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी दिली जात असून भाजपच्या हक्काच्या जागा सोडल्या गेल्या आहेत. “आम्ही रात्रंदिवस पक्षवाढीसाठी मेहनत घेतली आणि आता आमच्याच नेत्यांना शिव्या देणाऱ्यांच्या प्रचारासाठी आम्ही कसे उभे राहायचे?” असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. हा गोंधळ पाहता, महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी जो वाद निर्माण झाला होता, त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद निवडणुकीत होताना दिसत आहे.

सिल्लोडच्या राजकारणाबाबत बोलताना मंत्री सावे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर थेट निशाणा साधला. “सिल्लोड सोयगावमध्ये मुख्यमंत्री आले तरी सत्तार बैठकीला आले नाहीत, ना त्यांनी कामात सहकार्य केले. पालकमंत्र्यांच्या फोनलाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट सकाळी व्हिडिओ प्रसिद्ध करून स्वबळावर लढण्याची भाषा केली. त्यामुळे आता आम्हीही तिथे आमचे ‘एबी फॉर्म’ देणार आहोत,” असे सावे यांनी ठणकावून सांगितले. यामुळे जिल्ह्यात ५२ जागांवर युती असली तरी ११ जागांवर युतीमधील दोन घटक पक्ष समोरासमोर भिडणार आहेत. ही लढत जिल्ह्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महायुतीच्या या जागावाटपानुसार आता उमेदवारांच्या अधिकृत याद्या लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल, असा दावा केला जात असला तरी, भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा रोष आणि सिल्लोडमधील अब्दुल सत्तार यांचे बंड शमवण्याचे मोठे आव्हान भाजप आणि शिवसेना नेत्यांसमोर आहे. जर ही बंडाळी वेळीच रोखली नाही, तर त्याचा फटका महायुतीच्या एकूण निकालावर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. एकूणच, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युती झाली असली, तरी कार्यकर्त्यांच्या मनात मात्र अजूनही ‘बिघाडी’ कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या ११ वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतोय आणि आमचे आजोबा यांनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये जनसंघ पक्षापासून काम केले आहे परंतु आज जे भारतीय जनता पार्टीने वैजापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने युती केली ही युती कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यासारखी आहे आत्ताच दीड महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिकेमध्ये आम्ही स्व-बळावर लढून सत्ता स्थापन केली आज देखील वैजापूर तालुक्यामध्ये आमची ताकद असून आम्ही जिल्हा परिषद मध्ये सहा ते सात जागांवर तसेच पंचायत समितीचे दहा ते पंधरा जागांवर निवडून येण्यासारखी परिस्थिती असताना देखील वरिष्ठांनी हा निर्णय घेतला हा अन्यायकारक असून सिल्लोड मध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते तर वैजापूर तालुक्यात का नाही? वरिष्ठांनवर आम्हाला विश्वास आहे की ते आम्हाला पक्षाचे बी-फॉर्म देऊन मैत्रीपूर्ण लढत करतील नसता आमची पुढची भूमिका वैजापूर विकास आघाडी ज्ञानेश्वर पाटील जगताप अण्णा तसेच कैलासजी पवार यांच्या नेतृत्वात स्थापन करून निवडणूक लढवण्यात येईल.

-केतन दिगंबर आव्हाळे (तालुका सरचिटणीस, भाजप, वैजापूर)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here