
वैजापूर । दीपक बरकसे
बँकेत व्यवहार करण्यासाठी गेलेल्या सुपरमार्केटच्या कर्मचाऱ्याची पिशवीच काही क्षणात रिकामी झाली. बँकेच्या कॅश काऊंटरवर घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे वैजापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार (दि १३ ऑक्टोबर) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वैजापूर येथील एस.बी.आय. बँक शाखेत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पराग साहेबराव गायकवाड (वय ५२, रा. गायकवाड वस्ती, जुना आधुर रोड, वैजापूर) हे के.पी. सुपर मार्केट, स्टेशन रोड येथे मागील तीन वर्षांपासून काम करीत आहेत. ते या मार्केटचे बँक व्यवहार व इतर वित्तीय कामकाज सांभाळतात. सोमवारी नेहमीप्रमाणे त्यांनी मार्केटचा व्यवहार बँकेत जमा करण्यासाठी ४ लाख ५० हजार रुपयांची कॅश घेऊन एस.बी.आय. बँकेत प्रवेश केला.
दुपारी अंदाजे १२.४५ च्या सुमारास त्यांनी बँकेतील कॅश काऊंटरवर पिशवी ठेवून पैसे जमा करण्याची तयारी सुरू केली. त्यावेळी बँकेत इतर ग्राहक बसलेले होते. काही क्षणांनी त्यांनी पिशवी उघडून पैसे तपासले असता २ लाख ५५ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे लक्षात आले. घटना लक्षात येताच गायकवाड यांनी तत्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावले.
त्या वेळी बँकेत अर्जुन गायकवाड (रा. बंजरग चौक, वैजापूर) आणि विठल धमाजी घाटे (रा. वानवाडी, वैजापूर) हे उपस्थित होते. त्यांनी पिशवीची तपासणी केली असता उरलेली रोकड फक्त १ लाख ९५ हजार रुपये इतकी असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ मार्केटचे मालक प्रकाशचंद शांतीलाल बोथरा यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. काही वेळातच बोथरा बँकेत दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली. बँकेच्या परिसरात शोध घेण्यात आला; मात्र चोरी झालेल्या पैशांचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही.
प्राथमिक चौकशीतून असे दिसून येत आहे की, चोरट्याने अत्यंत नियोजनपूर्वक आणि वेगाने ही चोरी केली आहे. बँकेच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने पिशवीतील रोकड हातोहात चोरून नेली. घटनेदरम्यान कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नसल्यामुळे कोणीही संशय घेतला नाही. या घटनेनंतर बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
घटनेनंतर पराग गायकवाड यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात हजर राहून आपला सविस्तर जबाब नोंदवला. त्यांनी पोलिसांना सांगितले की, “मी बँकेत कॅश जमा करण्यासाठी गेलो असता माझ्या पिशवीतून २ लाख ५५ हजार रुपये चोरीस गेले. या रकमेमध्ये ५०० रुपयांच्या ५०० नोटा आणि ५० रुपयांच्या १०० नोटा होत्या.” गायकवाड यांनी पोलिसांकडे विनंती केली आहे की, चोरी केलेली रोकड शोधून त्यांना परत मिळावी आणि आरोपींचा शोध घेतला जावा. पोलिसांनी या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ही घटना बँकेच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करते. दिवसा, ग्राहकांच्या गर्दीत आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीत असलेल्या बँकेत इतक्या मोठ्या रकमेसह चोरी होणे हे अत्यंत चिंताजनक मानले जात आहे. ग्राहकांच्या नजरेतून हे स्पष्ट झाले की, बँकेत पुरेशी सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हते. बँकेच्या कॅश काऊंटर परिसरात गर्दी असूनही कोणीही संशयास्पद हालचालींची नोंद घेतली नाही.
घटनेनंतर वैजापूर शहरात या चोरीची जोरदार चर्चा सुरू आहे. व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेकांनी आपल्या व्यवहारांबाबत अधिक सतर्कता बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. काही स्थानिक व्यापाऱ्यांनी बँक व्यवस्थापनाकडे ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वैजापूर पोलिसांनी बँकेतील तसेच परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मागवले आहेत. त्याचबरोबर बँकेत त्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व ग्राहकांची यादी तयार केली जात आहे. संशयित व्यक्तींची चौकशी करून घटनेचा तपास जलद गतीने सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



