
वैजापूर । दीपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील नांदगाव शिवारात शुक्रवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये भरधाव वेगात असलेली कार पलटी होऊन दोन दोन भावांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताने संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात असून भगगाव गावावर शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातात दर्शन पांडुरंग जगताप (वय १६) आणि राहुल राजाराम जगताप (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही भगगाव येथील रहिवासी होते.
प्राथमिक माहितीनुसार हे दोघे शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास दर्शन आणि राहुल हे त्यांच्या चारचाकी वाहनातून वैजापूरकडे जात होते. गाडीचा वेग अतिशय जास्त होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नांदगाव शिवारातील एका वळणावर अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या बाहेर जाऊन उलटले. अपघात इतका भीषण होता की गाडीचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला होता.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना गाडीतून बाहेर काढून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
हा अपघात नेमका कशामुळे घडला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, घटनास्थळी तपास करणाऱ्या पोलिसांनी वाहनाचा वेग खूपच जास्त होता असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. रस्त्याचा वळण आणि नियंत्रण सुटल्यानेच ही दुर्घटना घडली असावी, अशी शंका व्यक्त होत आहे.



