धस-मुंडे 'राजकीय व्हॅलेंटाईन'ने राजकीय वातावरण तापलं!

मुंबई । Mumbai

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya), मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्यासह भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) अशा काही नेत्यांना हे प्रकरण लावून धरल्याचे पाहायला मिळत आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळचे संबंध असल्याचा मुद्दा या नेत्यांकडून सातत्याने उपस्थित करण्यात आला आहे. यादरम्यान आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळे आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुप्त भेट घेतल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात आता समेट झाला का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीनंतर त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष खदखदत आहे. तसेच राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.

धसांकडून दगाफटका होईल असे वाटले नव्हते – जरांगे पाटील

एखाद्या माणसाच्या अंगात इतका वेगळेपणा असू शकतो हे पहिल्यांदा पाहायला मिळालं. क्रूर हत्या झाली, याचं यांना काही वाटलं नाही. एखादं पद देतील किंवा लाभ होईल म्हणून तुम्ही भेटता हे चुकीचं आहे. या गुप्त भेटीची माहिती ज्याने बाहेर आणली त्याला मार्क दिले पाहिजे. त्याच व्यक्तीने खऱ्या अर्थाने मराठा समाज जागा केला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. गुप्तपणे भेटण्याची गरज काय होती? हा खून दाबण्याचा प्रकार आहे. धनंजय मुंडे यांना असं झालं तरी काय होतं? ते कोणत्या कोमात गेले होते? त्यांना काय भेटायचं? ते काय समाजापेक्षा मोठे आहेत काय? या मागचा राजकीय स्वार्थ काय? असा सवाल करतानाच एक चोर डाका टाकणारा, चार चार साडेचार तास कट शिजवतो, हे काही आम्हाला कळत नाही का? साडेचार तास बैठक झाली हे आता बावनकुळे यांनीच सांगितलंय, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

चोर, डाके टाकणे यापेक्षा यांना भारी उपमा दिली पाहिजे. आम्ही धस यांच्या खांद्यावर मान टाकली. सर्व निर्धास्त झोपले. त्यांनी तर मानच छाटली. इकडे तिकडे भेटून संतोष अण्णांसाठी असंच भेटणार का?, असा सवाल करतानाच हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं, त्याच दिवशी मला हे लक्षात आलं होतं. धस यांच्या मागे आमदार, खासदार, मुख्यमंत्री कोणीच नसताना ते निवडून आले आहेत. तुम्ही क्रूर व्यक्तीला भेटून आलाय, असा हल्लाच त्यांनी चढवला. संतोष देशमुख यांची हत्या करून बीडचा विकास कसा करायचा आहे? तुमची अस्मिता मेलीय का? तुम्ही खून पचवणार असाल तर तुमच्यासारखे महापापी नाही. चंद्रशेखर बावनकुळे जर मिटवून घ्या म्हणत असतील तर धनंजय मुंडे 302 च्या प्रकरणात आहेत, असा त्याचा अर्थ होतो. जो माणूस चार घंटे बसून चर्चा करतो, त्याच्यावर आता काय विश्वास ठेवावा? संतोष अण्णा खून प्रकरणं दाबलं गेलं तर त्याला धसच जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हे अतिशय चुकीचे आहे – दमानिया

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, मला देखील चार ते पाच दिवसांपूर्वी समजले होते की, दोघांची भेट झाली. मात्र, मला असे सांगण्यात आले की चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली. पण अशी भेट झाली असेल तर ते फार दुर्दैवी आहे. कारण आता सुरेश धस त्यांच्याविरोधात लढतील की नाही? हे सर्व मला विक्षिप्त वाटते. हे अतिशय चुकीचे आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारिक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत.

हे वाचलं का? – जिल्हा बँकेच्या महिला कॅशिअरचा विनयभंग, तालुका विकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

धस यांची विश्वासार्हता संपली – सुषमा अंधारे

लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार सुरू आहे. यामध्ये तथ्य असेल तर सुरेश धस यांची विश्वासार्हता संपलेली आहे. याचसोबत देवेंद्र फडणवीस यांचीदेखील विश्वासार्हता संपलेली असेल, अशी तीव्र प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

आमच्यात मतभेद आहेत, मनभेद नाही – बावनकुळे

या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो. धनंजय मुंडे आणि आमचे जुने संबंध आहेत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची पारिवारिक भेट झाली. आम्ही तिघेही पारिवारिक भेट म्हणून भेटलो. तेथे ‘कॉम्प्रमाइज’ करायला कोणी सांगितले नाही. आमच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाही.

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर करुणा शर्मा म्हणाल्या की, एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाली आहे आणि आज जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यात वाद सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे भेटीसाठी बोलावतात आणि मग म्हणतात की भेट झाली. या संपूर्ण विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. हा मुद्दा दाबायचा आहे, दिशाभूल करायची आहे आणि वाद पेटवायचा आहे, ही त्यांची योजना आहे, अशी टीका करुणा शर्मा यांनी केली आहे.

धस आणि वाल्मिक कराड एकच आहेत – संंजय राऊत

संंजय राऊत म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व करत आहेत, ते देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील, असं वाटलं होतं. मला तेव्हा लोकांनी समजावलं की तुम्ही धसांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील. धस आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. दुर्दैवाने हे सत्य होताना दिसतंय. मला वाईट वाटतंय. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. लहान मुले धसांच्या मागे न्यायासाठी धावत होते. जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर देव त्यांना क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा केला असेल आणि पाठीत खंजीर खुपसला असेल तर राज्याची जनता लक्षात ठेवेल. हे पाप आहे, त्याला क्षमा नाही. धसांनी असं केलं असेल तर विश्वासाघातापेक्षाही पुढचं पाऊल आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवर सुरेश धस काय म्हणाले?

धनंजय मुंडेंच्या ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी भेटलो, त्यांच्या निवासस्थानी भेटलो, तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. तब्येतीची चौकशी करणं यात गैर नाही.संतोष देशमुख प्रकरण व तब्येतीची विचारपूस करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. परवाच्या दिवशी भेटलो. भेटीनंतर बाहेर आल्यावर काय केलंय, हे तुम्हाला माहिती आहे. मुंडेंना रात्रीचं त्यांना दवाखान्यात नेले होते. मी अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणं व न घेणं याचा अधिकार अजित पवारांचा आहे, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. तसेच माझा लढा सुरुच राहणार आहे, असंही सुरेश धस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here