
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या मस्साजोग येथे जाऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या मुलीचे संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे.
शरद पवार यांनी आज देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. ही घटना कशी घडली? नेमके काय घडले? याचाही त्यांनी माहिती घेतली. यावेळी शरद पवारांनी देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदार घेतली. शरद पवार म्हणाले की, देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या कर्मवीर वसतिगृहात शिक्षणासाठी पाठवून द्या, तिथे ९ हजार मुली शिकत आहेत. या मुलीचा कॉलेजपर्यंच खर्च मी करतो, तुम्ही काळजी करू नका, असे शरद पवार म्हणाले.
बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात लौकिक आहे. महाराष्ट्राचा साखर उद्योगाला हातभार लावणारा जिल्हा हा जिल्हा आहे. आज या जिल्ह्यात जे घडलं ते कोणालाही न पटणारं आहे. संतोषचा यात काहीच संबंध नसताना हे घडलं. या प्रकरणाची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. आमच्या सहकाऱ्यांनी यात न्याय मिळावा म्हणून लोकसभेत आवाज उठवला. बीडमध्ये आज दहशतीचं वातावरण आहे, पण त्यातून बाहेर पडा. हत्या करणारे आरोपी आणि सूत्रधार यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही शरद पवार यांनी केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाच्या खोलात जाणार नाही तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही असं शरद पवार म्हणाले.



