
राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी गुरुवारी बदल्यांचे आदेश काढले आहेत.
दरम्यान, या बदल्या झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती महत्त्वाच्या पदांवर आल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. जितेंद्र डुडी (jitendra dudi) यांना पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार देण्यात आल्यानंतर एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुणे जिल्ह्यात मोठ्या पदावर कार्यरत असल्याचं चित्र आहे.
जितेंद्र डुडी (jitendra dudi) हे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत. तर डुडी यांच्या पत्नी आंचल दलाल या आयपीएस असून त्या पुण्यातील राज्य राखीव दलात कार्यरत आहेत. याशिवाय त्यांचे भाऊ शेखर सिंह हे पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त आहेत. त्यामुळे पुण्यातील मोठ्या पदावर असलेल्या कुटुंबातील या सदस्यांचं कौतुक केलं जात आहे.
हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह
कोण आहेत जितेंद्र डुडी?
जितेंद्र डुडी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०१६ च्या शाखेतील सनदी अधिकारी आहेत. ते मूळचे जयपूरचे (राजस्थान) आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत झारखंड येथून सुरुवात केली असून, केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिवपदी देखील त्यांनी कामकाज पाहिले आहे. २०१८ मध्ये त्यांची महाराष्ट्रात पदस्थापना देण्यात आली. पुणे जिल्ह्यात यापूर्वी त्यांनी जुन्नर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारभार सांभाळला आहे. सातारा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
झारखंड केडरचे असलेले डुडी यांचा विवाह IPS आंचल दलाल यांच्याशी झाला. दलाल यांना महाराष्ट्र केडर मिळाले होते. त्यामुळे डुडी यांना महाराष्ट्र केडरमध्ये बदली मिळाली आहे. शेखर सिंह यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होण्याआधी ते सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांची जुलै २०२२ मध्ये बदली झाली. त्यानंतर रुचेश जयवंशी यांची साताऱ्याचे जिल्हाधिकारी झाले. त्यांच्यानंतर साताऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे जितेंद्र डुडी आणि शेखर सिंह या दाजी आणि मेव्हण्याने साताऱ्याचे जिल्हाधिकारी पद भूषवल्याचा दुर्मिळ योगायोग साधला आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



