
जालना । Jalana
मागील दोन वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला सरकारनं स्वतंत्र आरक्षण दिलं, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे, ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. जालनामध्ये माध्यमांशी संवाद साधून जरांगे पाटील यांनी उपोषणाची नवीन तारीख जाहीर केली आहे. २५ जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा १५ ते १६ महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं. २५ जानेवारीपासून पुन्हा अंतरवालीला आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



