
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरून राज्यात असंतोष निर्माण झाला आहे. सर्व स्तरातून त्यांच्या न्यायाची मागणी केली जात आहे. अशातच मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे.
तसेच त्यांनी उद्या (दि.५) पुण्यात मोर्चा होणार असल्याची घोषणा करत मराठा बांधवांना एकत्र जमण्याचे आवाहन केले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आधी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आता परभणीत मोर्चा काढला आहे. यावेळी अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. यात मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकविण्यात आले, अशी माहिती आम्हाला मिळाली. मी कुणाचेही नाव घेऊन उगाच बोलत नाही. पण यापुढे संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आम्ही सहन केला. आतापर्यंत आम्ही कुणाचेही नाव घेतले नाही. पण यापुढे देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही, असा थेट धमकीवजा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, आम्हाला माज किंवा मस्ती नाही. पण आमची मुले जर रस्त्यावर येणार असतील तर आमच्यापुढे आता पर्याय नाही. तुम्ही लोकांना मारून आरोपींना घरात लपवून ठेवत असाल तर हे कसे काय सहन करायचे. सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळत होते. या हत्येमधील आरोपी आणि खंडणीमध्ये पकडलेल्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहीजे. त्यांना आतापर्यंत कुणी सांभाळले, त्यांना सहआरोपी केले पाहीजे. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, आम्ही संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागायला पुढे आलो तर आम्ही जातीयवादी होतो आणि तुम्ही आरोपींना सांभाळता, मग तुम्ही कोण होता. संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली, तो जातीयवाद नाही का? सरकार आणि इतरांना काय म्हणायचे असेल तर ते म्हणू द्या. पण समाज म्हणून आपल्याला लढावे लागेल, असे स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
हे वाचलं का? – फायनान्स कंपनीच्या वसूली एजंटचा धुमाकूळ, हफ्ता भरला नाही म्हणून शेतमजूरावर तलवारीने हल्ला
दरम्यान बीड, परभणीनंतर आता पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पुण्यात मोर्चा होणार आहे. यावेळी मराठा बांधवांना जमण्याचे आवाहन केलं आहे. या मोर्चासाठी आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनीही जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



