
देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती.
गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही सुरू केले, मात्र सिंह यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.
३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ साली डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली.



