
वैजापूर । दिपक बरकसे
तालुक्यातील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या जीवशास्त्राच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आला आहे. शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने अचानक भेट दिली असता, परीक्षाकेंद्राच्या परिसरात गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीत आणि इतर कॉपी साहित्य मोठ्या प्रमाणावर सापडले.
भरारी पथकाच्या प्रवेशासोबतच परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकांसह कॉपी साहित्य फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, संस्था अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालक आणि १५ पर्यवेक्षकांनी परीक्षा प्रक्रियेत गंभीर दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार वैजापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे वाचलं का? – “संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, महिलाही तयार होती, पण…”; भावाचा खळबळजनक खुलासा
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. अहवालानंतर संस्था आणि केंद्र संचालकांवरील कारवाईची शक्यता आहे. याप्रकरणात एका विद्यार्थ्यालाही दोषी ठरवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या या कठोर कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्राचार्य अजीनाथ काळे, अध्यक्ष जी. एस. पवार, सचिव वैशाली पवार, तसेच पर्यवेक्षक व्ही.एस. काटे, सी.यु. जाधव, एस.बी. गुंजाळ, के.के. घाटवळे, एच.बी. खंडीझोड, जे.डी. कुंदे, आर.बी. जाधव, व्ही.जी. पवार, जी. एस. डरले, ए. एस. निकम, आर.व्ही. कुंदड, के.एस. सोनवणे, आर.बी. नराडे, एस.एस. आहेर यांच्यावर महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विशिष्ट गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



