
भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे.
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटक, तेलंगणसारख्या राज्यांनी आज म्हणजेच २७ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
देशातील एखाद्या प्रमुख संवैधानिक पदांवर काम करत असलेल्या किंवा यापूर्वी काम केलेल्या व्यक्तींच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर सर्वच शासकीय इमारतींबरोबरच जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी असलेले राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवले जातात. राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीत संसदेबरोबरच सर्व सचिवालये, सर्व राज्यांमधील विधानसभा आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. या शिवाय देशाच्या बाहेरील भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो.
निधन झालेल्या व्यक्तीचे सामाजिक, राजकीय किंवा ती ज्या क्षेत्रात कार्यरत असेल त्या क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदानाचा विचार करुनच सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करायचा की नाही हे ठरवलं जातं. मात्र राष्ट्रीय दुखवटा कधी जाहीर करावा याबद्दल कोणतेही ठोस आणि कठोर नियम नाही. हा निर्णय त्या त्यावेळी घेतला जातो. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, समाजिक क्षेत्र, क्रिडा, मनोरंजन याशिवाय प्रशासकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या देशातील नामवंत व्यक्तींना राजकीय सन्मान देण्याच्या उद्देशाने त्यांच्या निधानानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो.
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तसंच युपीएच्या काळात म्हणजेच २००४ ते २०१४ या कालावधीत ते सलग दोन टर्म म्हणजेच १० वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाने एक सालस नेता गमावला आहे.



