बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपांचा खून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला असताना हा दावा केला. काल रात्री मला एका अनोळखी इसमाचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्कमुळे कॉल कनेक्ट होऊ शकला नाही. त्यानंतर त्या इसमाने मला व्हॉईस नोट पाठवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण तीन आरोपींचा खून झाला आहे, अशी माहिती या इसमाने दिली, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, हे ऐकून मी हबकलेच. ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी असून त्यापैकी तिघांचा खून झाल्याची माहिती अनोळखी इसमाने दिली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे. या माहितीची मी खातरजमा केलेली नाही आणि फोन करणारा अनोळखी माणूस कोण आहे, याचीही माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here