
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. ६ दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मात्र सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणामुळं एका युवकाची नोकरी गेली, तसंच त्याचं लग्न ठरलं होतं तेदेखील मोडलं. शिवाय त्याच्या कुटुंबावर बदनामीचा शिक्काही बसला. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी संशयित म्हणून अटक केलेल्या एका युवकावर हा वाईट प्रसंग आला आहे.
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी यापूर्वी छत्तीसगडमधील दुर्ग येथून एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं हे त्यानं सांगितलं. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या या संशयिताचं नाव आहे आकाश कनौजिया. ३१ वर्षांचा हा तरूण व्यवसायाने ड्रायव्हर आहे.
हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट
मुंबई पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर, रेल्वे संरक्षण दलाने १८ जानेवारी रोजी दुर्ग स्थानकावर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-कोलकाता शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून आकाशला ताब्यात घेतलं. त्यानंतर १९ जानेवारी रोजी सकाळी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पोलिस ठाण्यातून अटक केली. त्यानंतर दुर्गच्या रेल्वे सुरक्षा दलाने आकाशला सोडून दिलं.
आकाश म्हणाला की, जेव्हा माध्यमांनी माझे फोटो दाखवायला सुरुवात केली आणि मी या प्रकरणातील मुख्य संशयित असल्याचा दावा करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या कुटुंबाला धक्का बसला. मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझ्या मिशा आहेत हे त्यांना लक्षात आले नाही म्ह्णून त्यांनी माझ्यावर संशय घेतला. पण, सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला मिशा नव्हत्या.
आकाशने दावा केला की, घटनेनंतर मला पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारले की मी कुठे आहे. मी घरी असल्याचे त्यांना सांगितले तेव्हा फोन कट झाला. मी माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला जात होतो. तेव्हा मला दुर्गमध्ये ताब्यात घेण्यात आले आणि नंतर रायपूरला नेण्यात आले. तिथे पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकानेही मला मारहाण केली.
हे वाचलं का? – शेतीच्या बांधावरून वाद विकोपाला, मारहाणीत तरुणाचा जीव गेला
आकाश पुढे म्हणाला, सुटकेनंतर त्याच्या आईने त्याला घरी येण्यास सांगितले पण जेव्हा मी माझ्या मालकाला फोन केला तेव्हा त्याने मला कामावर येऊ नको असे सांगितले. त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. माझ्या आजीने मला सांगितलं की, माझ्या अटकेमुळे मुलीच्या कुटुंबाने लग्न रद्द केलं. माझ्या भावाचा दीर्घ उपचारानंतर मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाला विरारमधील त्यांचं घर विकून कफ परेडमधील चाळीत राहावं लागतंय.
माझ्याविरुद्ध कफ परेडमध्ये दोन आणि गुडगावमध्ये एक खटला दाखल आहे. पण याचा अर्थ असा नाही की, मला संशयित म्हणून ताब्यात घ्यावं आणि नंतर इतक्या वाईट स्थितीत सोडून द्यावं. आता मी सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या बाहेर उभा राहून नोकरी मागणार आहे. कारण त्याच्यासोबत जे झाले त्यामुळेच मी माझं सारं काही गमावून बसलो आहे, असेही आकाशने म्हटले आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



