वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या बँक खात्यातून तब्बल ३४ लाख १५ हजार ५९२ रुपये एका ऑपरेटरने स्वतःच्या खात्यात वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या आठवड्यापासून तालुक्यात या प्रकरणाची चर्चा जोरात सुरू असताना, पंचायत समिती प्रशासन मात्र पूर्णपणे निष्क्रिय होते. आमदार रमेश बोरनारे यांनी प्रशासनाला खडसावल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी या अपहाराला दुजोरा दिला असून, संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

आमदारांचा दट्ट्या, प्रशासन जागे

आमदार रमेश बोरनारे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. “१२ ग्रामपंचायतींच्या खात्यातून ३४ लाख रुपये गायब झाल्याची माहिती मला मिळाली आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका, असे मी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. चौकशीत सर्व काही समोर येईल, पण अपहार झाल्याचे निश्चित आहे,” असे बोरनारे यांनी ठणकावले. त्यांच्या या दट्ट्यामुळे प्रशासनाला जाग आली असून, कारवाईला गती मिळाली आहे.

कोणत्या ग्रामपंचायतींचा समावेश?

या प्रकरणात चोरवाघलगाव, हाजीपूरवाडी, आंचलगाव, रघुनाथपूरवाडी, मनेगाव, खरज, भिवगाव, अव्वलगाव, सटाणा, भगाव, बेलगाव आणि वडजी या १२ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती आहे. काही ठिकाणी ऑपरेटरने रक्कम परत केल्याची चर्चा आहे, परंतु याबाबत अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांनी सांगितले, “यूटीआर क्रमांकाशिवाय रक्कम जमा झाल्याची खात्री होणार नाही. आम्ही याबाबत सखोल चौकशी करत आहोत.”

हे वाचलं का? – मोठी बातमी! महिला कीर्तनकाराच्या हत्येचे गूढ उकलले; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

प्रशासनाची बेफिकिरी उघड

हा प्रकार उघडकीस येण्यापूर्वी तालुक्यातील नागरिकांमध्ये याची चर्चा सुरू होती. मात्र, गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि सहायक गटविकास अधिकाऱ्यांना (एबीडीओ) याची काहीच माहिती नव्हती. यामुळे प्रशासन किती सावध आणि जबाबदार आहे, याची प्रचिती आली. “ऑपरेटरने ३४ लाख १५ हजार ५९२ रुपये स्वतःच्या खात्यात वळवले. याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत,” असे श्रीकृष्ण वेणीकर यांनी स्पष्ट केले.

अपहार कसा घडला?

शासनाच्या विविध योजनांचा निधी ग्रामपंचायतींना डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) द्वारे वितरित केला जातो. हा डीएससी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या नावावर असतो आणि गटविकास अधिकाऱ्यांचाही त्याच्याशी अप्रत्यक्ष संबंध असतो. प्रत्येक व्यवहारानंतर सरपंच, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांना संदेश प्राप्त होतो. मात्र, या प्रकरणात एका खासगी ऑपरेटरने १२ ग्रामपंचायतींच्या निधीपैकी ३४ लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळवले. ज्यांचे पैसे बाकी होते, त्यांनी ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणामुळे वैजापूर पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. डीएससीद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर प्रशासनाचे नियंत्रण का नव्हते, असा सवाल नागरिक विचारत आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी आता चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

हे वाचलं का? – ‘व्हिडिओ’ने उघड झाला ‘भोंदूबाबा’चा काळा चेहरा; पोलिसात गुन्हा दाखल

सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, लवकरच दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. हा अपहार तालुक्यातील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे उदाहरण ठरला आहे. नागरिक आता प्रशासनाकडून पारदर्शक आणि कठोर कारवाईची अपेक्षा करत आहेत. “प्रशासनाने यापुढे अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या प्रकरणाने वैजापूर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ग्रामपंचायतींच्या निधीवर डोळा ठेवणारी यंत्रणा अधिक सक्षम आणि पारदर्शक कशी करता येईल, यावर प्रशासनाला विचार करावा लागेल. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी तातडीने आणि प्रभावी कारवाई होणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here