बदली आदेशानंतर घाईगडबडीने बिलं काढण्याचा प्रयत्न, नवीन अधिकाऱ्याने लावला लगाम... वैजापूर नेमकं काय घडलं?

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर शहरातील एका अधिकाऱ्याच्या बदलीनंतर सरकारी कार्यालयात घडलेला प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बदलीच्या दुसऱ्याच दिवशी जुन्या अधिकाऱ्याने तात्काळ काही बिले काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवीन अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार हाणून पाडण्यात आला असून, एकाच कार्यालयात दोन कुलूप लावल्याच्या घटनेने अधिकच खळबळ उडाली आहे.

सायंकाळी आदेश, सकाळीच बिलं काढायचा प्रयत्न

सदर अधिकाऱ्याची बदली झाल्याचा आदेश सायंकाळी जाहीर झाला आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होताच, बदली झालेल्या अधिकाऱ्याने आपल्या खास कर्मचार्‍याला (पंटरला) तात्काळ बिले तयार करण्याचे आदेश दिले. यानुसार संबंधित कर्मचारी सकाळी 6:12 वाजता कार्यालयात हजर झाला.

व्हॉट्सॲपवर मेसेजची देवाणघेवाण

हा कर्मचारी कार्यालयात पोहोचल्याचा फोटो संबंधित अधिकाऱ्याला पाठवतो. त्यावरून अधिकारी “शो नको, रिझल्ट हवा. पाटीलशी बोला. रेडी फाईल तात्काळ आणता येईल का बघा,” असा रिप्लाय 6:26 वाजता देतात. यावरून या सर्व घडामोडी पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते.

हे वाचलं का? – श्रोते म्हणजेच शिव! वैजापूरमध्ये शिवमहापुराण कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रदीप मिश्रा महाराजांचे भाविकांना गौरवोद्गार

12:52 वाजता पुन्हा एकदा कर्मचारी व्हॉट्सॲपवर मेसेज करतो की, “महालक्ष्मीचे काम होऊ शकते.” हे स्पष्ट करताच नवीन अधिकाऱ्याला याबाबतची माहिती मिळते आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित विभागाच्या दारावर दुसरे कुलूप ठोकण्याचे आदेश दिले. कार्यालय सील करण्याचा निर्णय घेतल्याने संभाव्य आर्थिक घोटाळा टळला.

जुन्या अधिकाऱ्याला धक्का, कर्मचारी झाले सावध

यानंतर दुसऱ्या दिवशी बदली झालेले अधिकारी पुन्हा कार्यालयात हजर होतात. मात्र, यावेळी एकही कर्मचारी त्यांना भेटायला तयार नव्हता. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची स्थिती “उचलली बांगडी आणि मारली गोळी” अशी झाली.

नागरिकांत चर्चा, ‘तो कोण?’

ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर वैजापूर परिसरात प्रचंड चर्चेला उधाण आले आहे. नागरिक एकच चर्चा करत आहेत की, “बदली झाल्यानंतरही इतका आग्रह का? कोणतं महालक्ष्मी प्रकरण?” आता संबंधित अधिकारी नेमके कोण होते, हे जनतेनेच ओळखावे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगते आहे.

प्रशासनाकडून चौकशीची शक्यता

या प्रकारामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या आचरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बदलीनंतर देखील तातडीने बिले काढण्यामागचे कारण प्रशासन चौकशीद्वारे शोधण्याची शक्यता आहे. नवीन अधिकाऱ्याच्या वेळी घेतलेल्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे हा प्रकरण टळले, असं बोललं जात आहे.

ही घटना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. बदलीनंतरही कार्यालयावर पकड ठेवून काही फायनान्शियल निर्णय घ्यायचे प्रयत्न कसे होतात, हे या प्रकरणावरून स्पष्ट होते. अशा घटनांवर कडक कारवाई आणि पारदर्शक चौकशी हीच काळाची गरज आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here