माझं शहर, माझी जबाबदारी! वैजापूरमध्ये लोकप्रतिनिधींसह नागरिक रस्त्यावर झाडू घेऊन उतरले

वैजापूर । दीपक बरकसे

शहरातील सार्वजनिक परिसरांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या प्रश्नावर अखेर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. गटारींचे तुंबणे, रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग, आणि दुर्गंधी यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत आमदार रमेश बोरनारे आणि माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या पुढाकाराने एक व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

या स्वच्छता अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातून करण्यात आली. या उपक्रमाला शहरातील नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुढील सात दिवस ही मोहीम शहराच्या विविध भागांमध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती आमदार रमेश बोरनारे यांनी दिली.

शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची मुदत तीन महिन्यांपूर्वीच संपली आहे. त्यानंतर नव्या कंत्राटाची नेमणूक झालेली नसल्यामुळे संपूर्ण शहरात सफाईचे काम ठप्प झाले आहे. सध्या स्वच्छता विभागाकडे केवळ १६ कर्मचारी कार्यरत असून, हे मनुष्यबळ संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अपुरे पडत आहे. यामुळे प्रभागातील गटारी तुंबून राहिल्या आहेत, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत, आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत लोकसहभागातून हा प्रश्न सोडविण्याचे ठरवले.

या मोहिमेत पक्षभेद विसरून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. यामध्ये माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेरखान, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, डॉ. राजीव डोंगरे, भाजपा तालुकाध्यक्ष नारायण कवडे, शहरप्रमुख पारस घाटे, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयमाला वाघ, सुलभा भोपळे, सुनीता साखरे यांचा सक्रिय सहभाग होता. हे सर्वजण हातात झाडू, टोपल्या घेऊन रस्त्यावर उतरले. व्यापारी पेठ, मुख्य चौक, आणि रहिवासी भागातील रस्ते, गटारी, भिंती स्वच्छ करण्यात आल्या.

या उपक्रमाची एक विशेष बाब म्हणजे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. संगीता नांदूरकर यांनी स्वतः उपस्थित राहून कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. त्यांच्या या सहभागामुळे प्रशासन आणि जनतेमधील अंतर कमी झाले असून, नागरिकांनी याचे स्वागत केले.

शहरातील अनेक नागरिकांनी कुटुंबासह या मोहिमेत भाग घेतला. काहींनी स्वतःहून घरासमोरील परिसर स्वच्छ केला, तर काहींनी मोहिमेतील स्वयंसेवकांसाठी पाणी, चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली. स्वच्छता ही केवळ सरकारी कामगिरी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, याची जाणीव या उपक्रमातून सर्वांना झाली.

या उपक्रमाच्या निमित्ताने प्रशासन, राजकीय नेतृत्व आणि नागरिक यांच्यात एक प्रकारची एकजूट दिसून आली. ही एकजूट केवळ आजच्या उपक्रमापुरती मर्यादित न राहता, येत्या काळातही कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आमदार बोरनारे यांनी सांगितले की, “स्वच्छता ही शासनाच्या योजना किंवा आदेशांपुरती मर्यादित राहता कामा नये. प्रत्येक नागरिकाने स्वतः पुढाकार घेतला, तर कोणतेही शहर सुंदर, स्वच्छ आणि आरोग्यदायी होऊ शकते.”

शहरातील सध्याची समस्या केवळ तात्पुरत्या उपायांनी सुटणार नाही. यासाठी कंत्राटदारांची नव्याने नेमणूक, कर्मचारी संख्या वाढवणे, कचरा व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करणे अशा दीर्घकालीन उपायांची गरज आहे. प्रशासनाने तत्काळ कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

राजकीय पक्षांनी या मोहिमेत जेवढा उत्साह दाखवला, त्यातून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन झाले. निवडणूक जिंकण्यासाठी जनतेसमोर झुकणारे नेते, प्रत्यक्षात त्यांच्या समस्या समजून घेत त्यावर कृती करताना दिसल्याने सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शहरातील नागरिकांमध्ये ‘माझं शहर, माझी जबाबदारी’ ही भावना या उपक्रमामुळे जागृत झाली आहे. यामुळे येत्या काळातही असे उपक्रम स्वयंस्फूर्तीने राबवले जातील, असा विश्वास स्थानिक नेतृत्व व्यक्त करत आहे.

शहरात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन उचललेला हा पाऊल निश्चितच आदर्शवत ठरणार आहे. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता, इतर सामाजिक प्रश्नांवरही सामूहिक कृतीची दिशा दाखवणारा ठरेल, अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here