
वैजापूर । दिपक बरकसे
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सातवा दिवस वैजापूर मतदारसंघासाठी महत्त्वाचा ठरला. आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विधिमंडळात भरीव निधीची मागणी केली. त्यांच्या या प्रयत्नांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी स्वागत केले असून, विधानसभेतील त्यांच्या भाषणाची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.
स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी मागणी
वैजापूर शहराची लोकसंख्या वाढत असल्याने येथील नगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी आमदार बोरनारे यांनी मागणी केली. या योजनेच्या अंतर्गत नांदूर मधमेश्वर कालव्याच्या साहाय्याने पाणीपुरवठा कार्यान्वित करण्याचे ते म्हणाले. तसेच, सध्या बंद पडलेला शुद्ध पाणी फिल्टर प्लँट नूतनीकरणासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, असेही त्यांनी अधिवेशनात सांगितले.
हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा
स्वच्छतेसाठी निधी योग्य वापरण्याचा आग्रह
१५ व्या वित्त आयोगातून स्वच्छतेसाठी मिळणारा निधी ठेकेदारांकडे न जाता प्रत्यक्ष स्वच्छतेसाठी खर्च होण्यासाठी, नगरपालिका स्तरावर शिपाई कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची गरज असल्याचे बोरनारे यांनी निदर्शनास आणले. हा निधी योग्य कारणांसाठी वापरला गेला पाहिजे, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे.
साठवण तलाव आणि पोलीस ठाण्यांसाठी निधीची मागणी
गोयगाव येथे जागा खरेदी करून साठवण तलाव बांधण्यासाठी सरकारने निधी द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली. याशिवाय, वैजापूर व ग्रामीण पोलीस ठाण्यांना स्वतंत्र मंजुरी मिळावी आणि ५४ गावांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करावे, असेही त्यांनी सुचवले. शिवाय, शिऊर, विरगाव आणि वैजापूर पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारती पाडून त्याऐवजी नवीन इमारतींसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे ते म्हणाले.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा
जनतेतून आमदार बोरनारेंचे स्वागत
आमदार बोरनारे यांनी केलेल्या या विकासकामांच्या मागणीमुळे मतदारसंघातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागत करत, वैजापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यांच्या या मागण्यांवर सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


