मुंबईत मराठी येणं गरजेचं नाही! वाद होताच भय्याजी जोशींची 'भाषा' बदलली, आता म्हणतात...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त विधान केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. “मुंबईची कोणतीही एक भाषा नाही, विविध भाषा येथे बोलल्या जातात. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकावे, असे बंधन नाही,” असे त्यांनी घाटकोपर येथील एका कार्यक्रमात म्हटले होते. विशेषतः “घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे,” असे वक्तव्य केल्याने टीकेचा भडिमार झाला.

या विधानानंतर विरोधकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि काँग्रेस आमदार भाई जगताप यांनीही जोरदार टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढून नाराजी व्यक्त केली.

वाद वाढल्यानंतर भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिले. “मुंबईची भाषा मराठी आहे, याबाबत कोणतेही दुमत नाही. माझी मातृभाषा मराठी आहे आणि मराठीबद्दल मला अभिमान आहे. मात्र, मी सर्व भाषांचा सन्मान करतो. सर्वांनी त्याच दृष्टिकोनातून माझ्या वक्तव्याकडे पाहावे,” असे त्यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

त्यांनी पुढे सांगितले की, “माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असून, मुंबई ही महाराष्ट्राचा भाग असल्याने येथील भाषा मराठीच आहे. विविध भाषा बोलणारे येथे राहतात, त्यामुळे त्यांनी मराठी शिकावी आणि समजून घ्यावी, यावर कोणताही वाद नाही. भाषा ही प्रत्येक राज्याची ओळख असते.”

हे वाचलं का? – “संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, महिलाही तयार होती, पण…”; भावाचा खळबळजनक खुलासा

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळात या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. “मराठी ही महाराष्ट्र आणि मुंबईची भाषा आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांनी ती स्वीकारली पाहिजे. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे आणि ती जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

भैय्याजी जोशी यांच्या विधानावरून निर्माण झालेला वाद आता त्यांच्या स्पष्टीकरणामुळे काही प्रमाणात शांत झाला असला, तरी या मुद्द्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here