राहुल गांधींकडून मोठी घोडचूक; छत्रपती शिवरायांना जयंतीच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सोशल मीडियावरही शिवरायांना अभिवादनाचा वर्षाव होत असताना, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका पोस्टमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिल्याची पोस्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपलं शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भिडपणा आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली.” या पोस्टसोबत त्यांनी स्वतःचा एक जुना फोटोही शेअर केला, ज्यामध्ये ते शिवरायांची पूर्णकृती मूर्ती उंचावताना दिसत आहेत.

हे वाचलं का? – “संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, महिलाही तयार होती, पण…”; भावाचा खळबळजनक खुलासा

राहुल गांधी यांच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हटले की, “जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. राहुल गांधी यांना इतिहास आणि परंपरांचा आधार नाही.” त्यांनी राहुल गांधींनी ही पोस्ट त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीदेखील या चूकीवर आक्षेप घेतला. “राहुल गांधी यांच्याकडून जर चूक झाली असेल, तर त्यांनी माफी मागावी आणि ट्वीटमध्ये सुधारणा करावी. एवढी मोठी चूक त्यांच्या लक्षात का आली नाही?” असा सवालही त्यांनी केला.

या टीकेला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, विरोधक मुद्दामून या प्रकरणाचे भांडवल करत आहेत. “राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करताना ‘My Humble Tribute’ असे लिहिले. त्याचा अर्थ मी अभिवादन करतो, असा आहे. भाषांतराचा हा घोळ असून विरोधकांनी त्यावर राजकारण करू नये,” असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राहुल भाजपवरतच निशाणा साधला आहे. शिवराय या आराध्यांच्या संबंधाने आम्ही संवेदनशील आहोत. मात्र राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भक्तूल्यांनी भगतसिंग कोशारीवर साधा निंदाजनक ठराव सुद्धा का मांडला नाही किंवा राहुल सोलापूरकरवर कारवाई न करता कुठल्या बिळात लपून बसले होते याची आधी उत्तर द्यावी, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या या पोस्टवरून झालेल्या गोंधळामुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे. काहींनी राहुल गांधी यांना इतिहास व संस्कृती समजून घेण्याचा सल्ला दिला, तर काहींनी हा केवळ भाषांतराचा दोष असल्याचे म्हटले. या वादावर अद्याप राहुल गांधींची थेट प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात या मुद्द्यावरून नवीन राजकीय रणसंग्राम सुरू झाला आहे.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here