
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता जवळपास ७० दिवस होत आले आहेत. मात्र, अजूनही एक आरोपी फरार असून इतर आरोपींना शिक्षा झालेली नाही. अशातच, या प्रकरणावर विविध आरोप-प्रत्यारोप होत असताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी खळबळजनक खुलासा केला आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली. या भेटीदरम्यान मस्साजोग गावच्या ग्रामस्थांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत, संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला. यावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी पोलिसांवरच संशय व्यक्त केला.
धनंजय देशमुख म्हणाले, “जेव्हा मृतदेह आणला जात होता, तेव्हा मी केज पोलीस स्टेशनमध्ये होतो. मला शेवटचा फोन आला की, ‘अण्णांना लागलेलं आहे, हॉस्पिटलला न्यायचं आहे’ असं सांगण्यात आलं. मात्र, ही माहिती मीडियापर्यंत पोहोचलीच नाही, याचं आश्चर्य वाटतं. पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे.”
हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…
त्यांनी पुढे सांगितले, “गाडी कळंबच्या दिशेने नेली जात होती, त्यामागे मस्साजोग गावातील इतर गाड्याही होत्या. जर केजमध्ये पोलिस स्टेशन आणि उपजिल्हा रुग्णालय उपलब्ध असताना मृतदेह कळंबला का नेण्यात आला? या सर्व घडामोडींवरून हे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय बळावतो.”
पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, “हे सर्व प्रीप्लॅनिंग होतं. होतकरू, गरीब आणि वंचित समाजातील लोकांना संपवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. एका महिलेला पैसे देऊन तयार ठेवण्यात आलं होतं, जी पुढे जाऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार होती. हा कट अत्यंत गंभीर असून त्याचा संपूर्ण तपास व्हायला हवा.”
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती उघड केली. त्यांनी सांगितले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरण खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांच्या हस्ते संसदेत मांडण्यात आले. आम्ही अमित शाह यांना भेटून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. अमित शाह यांनी आम्हाला न्याय दिला जाईल, अशी हमी दिली आहे.”
हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा
सुळे पुढे म्हणाल्या, “मी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शब्द देते की कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जो कोणी या हत्येमागे आहे, त्याला फाशी झाली पाहिजे.” (Supriya Sule on santosh deshmukh murder case)
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांची विश्वासार्हता पुन्हा ऐरणीवर आली आहे. ग्रामस्थ आणि कुटुंबीयांच्या आरोपांमुळे पोलीस तपासावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या हत्याकांडाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणले जावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणातील पुढील पावले कोणती असतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



