
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल ४०६ शेतकऱ्यांची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
फसवणुकीच्या विरोधात गेल्या ६ दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणताही ठोस उपाय निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन आणखी तीव्र करत पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनासह अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे.
हे वाचलं का? – नायलॉन मांजाने घेतला तरुणाचा बळी, मे महिन्यात होणार होते लग्न
पाण्याच्या टाकीवर चढलेल्या आंदोलनकर्त्यांची माहिती कळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमा झाले आहेत. जमलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचा संताप वाढत असल्याचे दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय ?
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये एका व्यापाऱ्याने ४०६ शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांनी कांद्याचे पैसे द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करत मार्केट बंद केले. यानंतर आमदार बोरनारे यांनी मध्यस्ती करत चाळीस दिवसांचा कालावधी मागितला. मात्र या कालावधीत पणन संचालकांची परवानगी मिळवण्यात बाजार समितीला यश आले नाही.
मात्र या काळात बाजार समितीने काही शेतकऱ्यांना जमीनदार व संबंधित व्यापाऱ्याच्या गाळ्याच्या लिलाव करून जमा झालेले पैसे वाटले मात्र उर्वरित पैशाचं काय? यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपल्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालय समोर गर्दी केली. मात्र एकही जबाबदार संचालक व कर्मचारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला.
हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद
यानंतर उपोषणाच्या पाचव्या दिवशी शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. ऐन सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू असल्याने त्यांनी याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन संचालक रसाळ यांच्याशी संपर्क साधत गांभीर्याने प्रकरण बघून तातडीने यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनाही शेतकऱ्यांना पैसे देण्या बाबत योग्य आदेशित करावे असे निर्देश देण्यात आले आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा


