आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार, ठाकरे गटाची मोठी घोषणा

विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं जातंय. त्यामुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी फुटू शकते, अशा चर्चा सुरू होत्या. आता अखेर याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे.

आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकांसह राज्यातील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सर्वात मोठे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व निवडणूका स्वबळावर लढू… असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

‘नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायच आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षानी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

हे वाचलं का? – नाशिकमध्ये मध्यरात्री थरार! लाखो रुपयांचा गांजा जप्त, पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई… Video समोर

तसेच लोकसभेमध्ये इंडिया आघाडी स्थापन केली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली होती.. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिका मध्ये स्वबळावर निवडणूक लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत असं विधान केलं होतं. त्या संदर्भात संजय राऊत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, त्यांचं खरं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एक संस्कृती राहिलेली आहे आणि ती संस्कृती आम्ही देखील पाळलेली आहे. शेवटी राज्याचा विकास आणि जनतेचा विकास महत्वाचा असतो. पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही पाहिजे. मात्र, दुर्देवाने भारतीय जनता पक्षाने शत्रुत्व ठेऊन राजकारण करण्याची परंपरा सुरु केली, अशी टीकाही यावेळी संजय राऊत यांनी केली.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here