
समृद्धी महामार्ग हा राज्याच्या प्रगतीची भाग्यरेषा मानला जातो, परंतु या महामार्गावर होणारे अपघात आणि त्यानंतर होणारी वाहतूक कोंडी हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात केमिकल टँकर्सची वाहतूक होत असते. अशा वेळी एखादा अपघात घडल्यास त्या ठिकाणी अवघ्या ५ मिनिटांत २०० हून अधिक गाड्यांचा जॅम होऊ शकतो, इतका प्रचंड ट्रॅफिक फ्लो या मार्गावर आहे. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) रस्ते सुरक्षा अधिकारी आणि सल्लागार अभिजित वाघमारे यांनी एक विशेष ‘मास्टर प्लॅन’ तयार केला असून, या नियोजनामुळे अपघातानंतरची जीवितहानी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षा सल्लागार म्हणून निवड होताना अभिजित वाघमारे यांनी हा मास्टर प्लॅन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे मा.कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासमोर मांडला होता. या नाविन्यपूर्ण संकल्पनेची दखल घेत प्रशासनाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. वाघमारे यांच्या मते, केमिकल टँकर्स जेव्हा उलटतात किंवा त्यांचा अपघात होतो, तेव्हा त्यातील केमिकलची तीव्रता आणि प्रकार लगेच लक्षात येत नाही. अशा वेळी खबरदारीचा उपाय म्हणून ‘प्रिकॉशनरी मेझर्स’ घेणे अत्यंत गरजेचे असते. यात सर्वात मोठे आव्हान म्हणजे प्रवाशांचा ट्रॅफिक फ्लो प्रतिबंधित करणे. हा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वाघमारे यांनी ३ महत्त्वाच्या पायऱ्या सुचवल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात, महामार्गावर प्रवास करत असलेल्या लोकांसाठी ‘ट्रॅफिक इमर्जन्सी पोल्स’वर विशेष इमर्जन्सी लाईट्स आणि मोठे सायरन्स बसवण्याचे नियोजन आहे. महामार्गावर नुसत्या स्पीकरने आवाज पोहोचत नाही, म्हणून इमर्जन्सी रेड लाईट्सद्वारे प्रवाशांना काही किलोमीटर आधीच अलर्ट दिले जातील. एकदा का वाहनचालक थांबले की, त्या ठिकाणच्या स्पीकरवरून पुढील घटनेची आणि धोक्याची माहिती स्पष्टपणे देता येईल. दुसऱ्या टप्प्यात, जे लोक टोल नाक्यावरून महामार्गावर प्रवेश करण्यास तयार असतात, त्यांच्यासाठी टोलवर सायरन पोल बसवण्याची योजना आहे. यामुळे ट्रॅव्हलिंग रिस्ट्रिकशन्स येतील आणि लोक महामार्गावर प्रवेश करणे टाळतील, परिणामी अपघाताच्या ठिकाणी होणारी ट्रॅफिक जॅमची समस्या सुटेल.
तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात, जिथे जिथे महत्त्वाचे टोल नाके आहेत, तिथे देखील सायरन पोल कार्यान्वित केले जातील. यामुळे टोलवर होणारी गर्दी टाळता येईल. विशेष म्हणजे, हा मास्टर प्लॅन सुरुवातीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी तयार करण्यात आला होता. मंगेश चिवटे यांनी अभिजित वाघमारे यांना या विषयाचा सखोल अभ्यास करून हा प्लॅन तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. वाघमारे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, “अपघात कोणताही असो, त्यावर शास्त्रोक्त तोडगा काढणे शक्य आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.” सध्या या महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी २४ तास काम सुरू असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने समृद्धी महामार्गाचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


