पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांनी चांगलंच डोकं वर काढलं आहे. या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ही ‘पॅनिक सिच्युएशन’ आणि संभाव्य कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यात इंधन विक्रीवर तातडीने निर्बंध लागू केले आहेत.

काय आहे नवीन नियमावली? (३१ मार्च २०२६ पर्यंत लागू)

जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता कोल्हापूरकरांना खालील मर्यादेतच इंधन मिळेल:

  • दुचाकी वाहने: एकावेळी जास्तीत जास्त २०० रुपयांचे पेट्रोल.
  • चारचाकी वाहने: एकावेळी जास्तीत जास्त २००० रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल.
  • कॅन आणि बाटल्यांवर बंदी: कोणत्याही व्यक्तीला कॅन, प्लॅस्टिक बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

नियम मोडल्यास थेट कारवाई!

शहरातील काही पंपांवर बाटल्यांमध्ये इंधन दिले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आणि संबंधित पंपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. केवळ अफवांमुळे नागरिक साठवणूक करत आहेत. विनाकारण पेट्रोल-डिझेलचा साठा करणे सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे.

-जिल्हा पुरवठा कार्यालय, कोल्हापूर

अफवांवर विश्वास ठेवू नका

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंधन पुरवठा खंडित होण्याच्या चुकीच्या बातम्या फिरत आहेत. मात्र, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पुरवठा साखळी सुरक्षित आहे. घरात पेट्रोल साठवणे हे आगीच्या धोक्याला निमंत्रण देणारे ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here