
महाराष्ट्र राज्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या ‘लाल परी’ अर्थात एसटी बसचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि हायटेक होणार आहे. रस्त्यात बस बंद पडल्यामुळे (ब्रेकडाऊन) होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी आता जागतिक दर्जाची ‘स्मार्ट साइन सिस्टम’ कार्यान्वित करण्याची तयारी सुरू झाली आहे.
भारतीय रस्ते सुरक्षा, गुन्हेगारी आणि सायबर तपासणी क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ अभिजित वाघमारे यांनी ही क्रांतिकारी संकल्पना मांडली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी (OSD) मंगेश चिवटे यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेत या मोहिमेचे नेतृत्व हाती घेतले आहे. या दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून महाराष्ट्रातील रस्ते सुरक्षा आता एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे.
महाराष्ट्रातील रस्ते अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर एक धक्कादायक वास्तव समोर येते. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण दररोज सरासरी २० ते २५ इतके आहे. तांत्रिक बिघाडामुळे बस महामार्गावर उभी राहिली की, सुरक्षिततेचे कोणतेही आधुनिक साधन उपलब्ध नसल्याने चालक-वाहक आजही पारंपरिक पद्धतीचा वापर करतात. बसच्या मागे झाडाच्या फांद्या लावणे किंवा विटा-दगड ठेवणे ही पद्धत भारतात वर्षानुवर्षांपासून चालत आली आहे.
मात्र, रात्रीच्या वेळी किंवा धुक्यात हे दगड आणि फांद्या मागून येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाहीत. परिणामी, उभ्या असलेल्या बसला मागून वेगाने येणारी वाहने धडकतात. अशा प्रकारे उभ्या राहिलेल्या बसेस आपोआप ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण क्षेत्र) ठरतात. अभिजित वाघमारे यांच्या मते, सध्याची ही साइन सिस्टम अत्यंत सदोष आणि जुनाट आहे, जी बदलणे आता अनिवार्य झाले आहे.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी अभिजित वाघमारे यांनी एक ‘गेम चेंजर’ प्लॅन तयार केला आहे. या प्रस्तावानुसार, बसच्या मागील बाजूला असलेल्या रिकाम्या जागेचा वापर करून एक ‘स्मार्ट स्लायडिंग साइन बोर्ड’ बसवण्यात येईल. ड्रायव्हरने केवळ एक बटण दाबल्यास हा बोर्ड बाहेर येईल आणि ५०० मीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसेल.
विशेष म्हणजे हा बोर्ड डिजिटल असण्यासोबतच मॅन्युअली रिफ्लेक्टिव्ह देखील असेल आणि पूर्णपणे सौर ऊर्जेवर (Solar Based) चालेल. अंधारात अत्यंत ठळकपणे चमकणारा हा बोर्ड काम संपल्यानंतर पुन्हा बटण दाबून आत घेता येईल. भारतात असा प्रयोग याआधी कधीही झालेला नाही, असा दावा वाघमारे यांनी केला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी उभ्या बसला धडकून होणारे अपघात जवळपास शून्यावर येतील.
रस्ते सुरक्षेचा हा ऐतिहासिक बदल घडवून आणण्यासाठी मंगेश चिवटे यांनी कंबर कसली आहे. रस्ते अपघात हा विषय चिवटे यांनी केवळ शासकीय काम म्हणून न पाहता तो ‘मनावर’ घेतला आहे. अभिजित वाघमारे यांनी तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) त्यांनी स्वीकारला असून, त्यात स्वतःच्या काही कल्पक संकल्पना सुद्धा मांडल्या आहेत.
हा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करून त्याला प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्याची जबाबदारी मंगेश चिवटे यांनी स्वतः घेतली आहे. “महाराष्ट्रातील रस्ते अपघात कोणत्याही परिस्थितीत कमी झाले पाहिजेत,” असा स्पष्ट संदेश चिवटे यांनी दिला असून, वाघमारे यांच्यासोबत ते या प्रकल्पावर वैयक्तिकरीत्या बारीक लक्ष ठेवून आहेत.
अभिजित वाघमारे सध्या दररोज सरासरी १० नवीन प्रपोजल्सवर काम करत असून त्यांची पूर्ण ताकद त्यांनी या मोहिमेसाठी लावली आहे. या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश अतिशय भावूक आणि मानवी आहे. “प्रत्येक संध्याकाळी आणि रात्री कोणाचेही वडील किंवा कोणाचेही लेकरू सुरक्षितपणे, विनाअपघात घरी पोहोचले पाहिजे,” हीच अभिजित वाघमारे आणि मंगेश चिवटे यांची खरी प्रेरणा आहे. चिवटे यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे आणि वाघमारे यांच्या तांत्रिक ज्ञानामुळे महाराष्ट्र परिवहनच्या बसेस आता खऱ्या अर्थाने प्रवाशांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या ठरतील. या महत्त्वपूर्ण बदलामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात रस्ते सुरक्षेचा एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



