
दिपक बरकसे । वैजापूर
आजच्या धावपळीच्या, गर्दीच्या आणि तितक्याच स्वकेंद्रित होत चाललेल्या जगात, ‘माणुसकी’ आणि ‘प्रामाणिकपणा’ हे शब्द केवळ पुस्तकातच उरलेत की काय, असा प्रश्न पडतो. पण याच जगात असे काही निस्वार्थ लोक आहेत, जे आपल्या साध्या पण खऱ्या कृतीतून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा ठाम विश्वास देतात.
असाच एक थक्क करणारा आणि तितकाच अभिमानास्पद प्रसंग आज वैजापूर येथील एस.टी. बस स्थानकात घडला, जिथे एका सामान्य सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मोहावर मात करत आपल्या अतुलनीय प्रामाणिकपणाचा परिचय दिला. एस. टी. सुरक्षा रक्षक बी.आर. तडवी यांनी तब्बल साडेतीन लक्ष रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली एक बेवारस बॅग, तिच्या मूळ मालकाला सुखरूप परत करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 29 रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास वैजापूर बसस्थानक परिसरात सुरक्षा रक्षक बी.आर. तडवी गस्त घालत होते. त्यावेळी बसस्थानकातील बाकावर एक बेवारस बॅग त्यांच्या नजरेस पडली. संशयास्पद वस्तू समजून त्यांनी ती बॅग तात्काळ उचलून एस.टी. नियंत्रक कार्यालयात जमा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
दरम्यान, सुमारे दोन तासांनंतर प्रवासी गणेश देविदास जानराव हे बसस्थानकात आले आणि त्यांनी आपली बॅग हरवल्याचे सांगत चौकशी सुरू केली. त्या वेळी सुरक्षा रक्षक तडवी यांच्या लक्षात आले की, तीच बॅग त्यांनी नियंत्रक कार्यालयात जमा केली होती. त्यांनी तत्काळ संबंधित प्रवाशाला एस.टी. नियंत्रकांच्या कार्यालयात नेले. तेथे ओळख पडताळणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रवासी जानराव यांनी बॅगेचे अचूक वर्णन दिल्याने ती त्यांचीच असल्याचे निश्चित झाले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बॅग उघडण्यात आली असता, त्यात तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तू असल्याचे दिसून आले.
या प्रामाणिक कृतीबद्दल वैजापूर एस.टी. आगाराचे प्रमुख किरण धनवटे तसेच स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी सुरक्षा रक्षक बी.आर. तडवी यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “तडवी यांची प्रामाणिकता ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सार्वजनिक ठिकाणी काम करताना जबाबदारी आणि सचोटी कशी जपावी याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.” या प्रसंगी एस.टी.चे टी.आय. भदाणे, श्री. कोकाटे अण्णा, गरुड,ुळे, जाधव, गंगवाल, ठाकूर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी तडवी यांच्या कामगिरीचे अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
या घटनेमुळे एस.टी. विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडूनही तडवी यांच्या प्रामाणिकतेबद्दल प्रशंसेचा वर्षाव होत आहे. आज ज्या काळात हरवलेली वस्तू मिळण्याची शक्यता कमी असते, त्या काळात बी.आर. तडवी यांनी दाखवलेला प्रामाणिकतेचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या या कार्यामुळे “सार्वजनिक सेवेत प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे” असा विश्वास नागरिकांमध्ये अधिक दृढ झाला आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



